

पुणे-वानवडी : वानवडी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. सोसायटीतील वीज मीटर बॉक्सला लागलेली आग क्षणार्धात शेजारी उभ्या असलेल्या वाहनांपर्यंत पसरली. या आगीत दोन दुचाकी आणि दोन कार जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वानवडी येथील साळुंखे विहार रस्त्यावर असलेल्या मेस्ट्रोज फेज-२ या इमारतीत ही घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या वीज मीटर बॉक्समधून अचानक मोठा आवाज झाला. स्फोटासारखा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी पार्किंगकडे धावले असता मीटर बॉक्सला आग लागलेली दिसून आली. काही क्षणांतच ही आग जवळ उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि दोन कारपर्यंत पोहोचली. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिवाशांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला आणि अग्निशमन दलाला कळविले.
दरम्यान, सोसायटीतील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने आगीचा वेग काही प्रमाणात कमी झाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीच्या कारवाईत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, सोसायटीतील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसती, तर आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरण्याची शक्यता होती आणि मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात वीज मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.