

पुणे : ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार असल्याने भारतीय संस्कृती निरंतर आहे. याचा अर्थ भौतिकता, विज्ञानाकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही. एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू आहे. विविधतेचा सन्मान करून स्वीकारणे महत्त्वाचे आहे. ज्ञान दृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत आयोजित पुणे लिट फेस्टचे उद्घाटन खान यांच्या हस्ते
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये झाले. त्यावेळी ते बोलते होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी यावेळी उपस्थित होते.
मराठे म्हणाले, पुन्हा पुन्हा वाचले जाते ते अभिजात साहित्य असते. ज्ञान, मनोरंजन आणि समाजाला दिशा देण्याची ताकद साहित्यामध्ये असते. पुणे लिट फेस्टमध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. वाचा, ऐका आणि भारत समजून घ्या ही या महोत्सवाची संकल्पना आहे.
राजेश पांडे म्हणाले आरिफ मोहम्मद खान यांच्यासारखे विद्वान लिट फेस्टच्या उद्घाटनाला येणे ही भाग्याची गोष्ट आहे. गेल्या वर्षी पुस्तकांच्या २५ लाख प्रती विकल्या गेल्या. तरुण वाचतात हे या महोत्सवाने सिद्ध केले.
- ब्रह्मज्ञानाच्या जवळ नेते ती कला, साहित्य असते. साहित्याचा आस्वाद, सज्जनांचे सान्निध्य हा अमृतानुभव असतो. हे आपल्या परंपरेत मानले जाते.
- ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वांत प्राचीन मानले आहे, यापेक्षा भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अन्य पुराव्याची गरज नाही.
- अरबांनी भारतीय साहित्याचा पहिल्यांदा अनुवाद केला. युरोपच्या अवकाश अभ्यासाचा आधार सूर्य सिद्धांत हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अरबीतून युरोपात गेला. त्यामुळे भारतीय संस्कृती ज्ञान आणि प्रज्ञेच्या संवर्धनाची संस्कृती आहे.
- पुणे हे सांस्कृतिक, साहित्यिक चेतनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, त्यांचा गीतारहस्य ग्रंथ, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा फुले यांची आठवण या शहरामुळे आहे, असेही खान यांनी नमूद केले.
फोटो - पुणे पुस्तक महोत्सव नावाने सेव्ह आहे.
फोटोओळ - पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत आयोजित पुणे लिट फेस्टचे उद्घाटन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याहस्ते झाले. या वेळी उपस्थित मान्यवर.