

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवात वाचकांची होणारी गर्दी, पुस्तकांची विक्री आणि त्यातून होणारी उलाढाल दरवर्षी विक्रम प्रस्थापित करत आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा पुण्याची ओळख झाला असून, त्या अंतर्गत उद्या ९ डिसेंबरला होणाऱ्या शांतता..
पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सर्व पुणेकरांनी सहभागी होत नवा विश्वविक्रम घडवावा, असे गौरवोगार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काढत पुणे पुस्तक महोत्सवाच्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १३ ते २१ डिसेंबर कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे प्रवेशद्वार आणि पुण्याच्या वाचनसंस्कृतीची ओळख दर्शविणारे पुस्तकरुपी बुरुज असे महोत्सवाचे बोधचिन्हच भव्य-दिव्य प्रवेशद्वाराच्या स्वरुपात साकारण्यात आले आहे.
त्याचे उद्घाटन रविवारी सायंकाळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, सुहाना उद्योग समूहाचे विशाल चोरडिया, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, लोकमान्य मल्टिपर्पज बँकेचे सुशील जाधव, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पांडे म्हणाले, '' पुणे पुस्तक महोत्सव वाचन चळवळ समृद्ध करण्यासोबतच नवनवीन विश्वविक्रम प्रस्थापित करीत आहे त्यातच आता शांतता.. पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम भारतीय नागरिकांनी सिंगापूरला शांतता.. सिंगापूरचे नागरिक वाचत आहेत, अशा पद्धतीने केला आहे. याहून आपल्याला पुणे पुस्तक महोत्सवाची प्रचिती लक्षात येते. येत्या ९ डिसेंबरला होणाऱ्या शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन, नवा विश्वविक्रम प्रस्थापित करावा , असे आवाहन पांडे यांनी केले.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या भव्य प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
...........................
पुणे पुस्तक महोत्सवाला पुणे महापालिकेचे सहकार्य लाभले असून, या महोत्सवात पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या भव्य प्रवेशद्वाराप्रमाणेच महोत्सवही भव्य स्वरूपात होणार आहे. या महोत्सवामुळे नागरिक वाचनाकडे वळण्यासाठी मदत होत असून, पुण्याचेही नाव जगाच्या नकाशावर येत आहे. त्यामुळे सर्व पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवातील सर्व साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि शांतता... पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
पृथ्वीराज. बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका