

पुणे : पुण्यात जन्मलेल्या आणि सध्या सियाटल (वॉशिंग्टन स्टेट, यूएसए) येथे वास्तव्यास असलेल्या मुद्रा विशाल माचेवाडने 'मिस टीन इंडिया वॉशिंग्टन 2025' हा मानाचा अॅवॉर्ड पटकावत जागतिक मंचावर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
ग्लोबल वुमन फेस्टिवलमध्ये आयोजित या स्पर्धेत मुद्राने नृत्य, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्याच्या जोरावर आघाडी घेत विजेतेपद मिळवले.
दहावीत शिकणारी मुद्रा भरतनाट्यमची प्रशिक्षित नृत्यांगणा आहे. तिने बॉलीवूड, सेमीक्लासिकल शैलीतही प्रभावी सादरीकरणे केली आहेत. मुद्राचे आई-वडील सायली आणि विशाल माचेवाड अमेरिकेत स्थायिक असून, वडील सियाटलमध्ये कार्यरत आहेत, तर आई व्यावसायिक आहेत.
शेती हा व्यवसाय असणाऱ्या कै. मारुतीराव माचेवाड यांच्या परिवारातील ही तिसरी पिढी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे नवीन पर्व लिहित असल्याचा अभिमान कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.