

पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत बँक खातेदारांची फसवणूक केली. बँक खात्याला जोडलेल्या मोबाइल क्रमांक 'हॅक' करुन गोपनीय माहिती मिळविली.
या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी खात्यातून ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा आणि मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत एका ५५ वर्षीय तक्रारादाराने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरट्यांनी चोरली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून २९ लाख ९८ हजार ९७७ रुपये लांबविले. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.
अशाच पद्धतीने सायबर चोरटा मुंढवा भागातील एकाच्या बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५० हजार रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.