

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट अर्थात सीमॅट परीक्षा येत्या 25 जानेवारीला घेण्यात येणार असल्याचे एनटीएच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सीमॅट २०२६ साठी 17 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तर नोंदणी करण्यासाठी 17 नोव्हेंबरपर्यंत संधी देण्यात आली होती. एआयसीटीईच्या माध्यमातून व्यवस्थापन शाखेच्या पदव्युत्तर पदव्यांसाठी म्हणजेच एमबीए अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेनंतर विद्यार्थी भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालयांत प्रवेश घेऊ शकतात. संबंधित परीक्षा ऑनलाइन पध्दतीने इंग्रजी माध्यमातून घेण्यात येणार आहे. परिमाणात्मक तंत्रे, तार्किक तर्क, भाषा आकलन, सामान्य जागरूकता आणि नवोन्मेष आणि उद्योजकता आदी विषयांवर संबंधित परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.
परीक्षेचे शहर आणि केंद्राची सूचना परीक्षेपूर्वी एनटीएच्या वेबसाइट https://cmat.nta.nic.in/ वर प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेविषयीची अद्ययावत माहिती तसेच सूचनांसाठी एनटीएच्या संकेतस्थळाला भेट देत राहण्याचे आवाहन एनटीएच्यावतीने करण्यात आले आहे.