

पुणे: एआय बॉट ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ६ ते ५० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यासह महाराष्ट्रातील नागरिकांना तब्बल १४ कोटी ७० लाख ९७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘बोट ब्रो’ आणि तिच्याशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दुबईत वास्तव्यास असलेल्या मुख्य सूत्रधारासह प्रमोटर्स आणि संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळातील सदस्य अशा २३ जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात लवीश चौधरी, विजय नारायण नायडू, राजनंदिनी नायडू, कुणाल खेडेकर, वैशाली खेडेकर, उमेश जरग, ज्ञानेश्वरी जरग, साहील धुमाळ, समीर काटे, शैलेश कणव, प्रमोद कदम, भरतकुमार सोलंकी, पोपट चोरगे आणि ललित प्रजापती यांच्यासह संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक चांगदेव भोसले (वय २५, रा. शेटफळ गढे, ता. इंदापूर, जि. पुणे) हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांची आरोपी उमेश जरग याच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपींनी त्यांना गुंतवणुकीच्या योजनांची माहिती दिली.
बाणेर येथील ऑर्चिड हॉटेल, वाकडमधील टिपटॉप आणि हिल्टन हॉटेलमध्ये भव्य सेमिनार आयोजित करून एआय बॉट ट्रेडिंग आणि टीएलसी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आमिषाला बळी पडून भोसले यांनी स्वतःच्या तसेच आई-वडिलांच्या बँक खात्यांतून आणि रोख स्वरूपात एकूण २२ लाख ७० हजार रुपये गुंतवले. मात्र, अपेक्षित परतावा मिळाला नाही. गुंतवलेली रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला.
ईडीच्या कारवाईनंतर कंपन्यांची नावे बदलली
फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘बोट ब्रो’ कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे काढण्याचे पर्याय बंद करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ‘बोट अल्फा’, ‘क्रॉस मार्केट’ आणि ‘माईन क्रिप्टो’ अशा वेगवेगळ्या नावांनी वेबसाइट आणि डोमेन तयार करण्यात आले. जुन्या गुंतवणुकीची रक्कम मिळवण्यासाठी नव्याने गुंतवणूक करण्याच्या अटी घालून नागरिकांकडून आणखी पैसे उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुख्य प्रमोटर्स दुबई आणि सौदी अरेबियात गेल्याचेही तपासात समोर आले आहे.
२१ गुंतवणूकदारांची १४.७० कोटींची रक्कम अडकली
आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत भोसले यांच्यासह २१ प्रमुख गुंतवणूकदारांची एकूण १४ कोटी ७० लाख ९७ हजार रुपयांची रक्कम अडकल्याचे समोर आले आहे. पुणे, मुंबई, सातारा आणि बारामती परिसरातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा संभाजी मोरे पुढील तपास करीत आहेत.