

पुणे: ग्रामीण भागात पिण्याच्या आणि सिंचनाच्या गरजेसाठी खडकवासला धरणातून सुरू असलेले रब्बीचे आवर्तन १५ नोव्हेंबरपर्यंतच सुरू ठेवण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार असून, रब्बी आवर्तनासाठी एकूण साडेचार टीएमसी पाणी देण्याचा अंदाज आहे. धरणांतील मर्यादित साठ्यामुळे उन्हाळी आवर्तनासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी नियोजनाबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि पशुधनाच्या गरजांचा विचार करून उपलब्ध साठ्याचे नियोजन करावे लागणार असल्याचा सूर बैठकीत होता.
यंदा रब्बी आवर्तन २५ सप्टेंबरपासून सुरू झाले. तर २९ ऑक्टोबरपर्यंत ३.१२ टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. पुढील कालावधीत आणखी साधारण सव्वा टीएमसी पाणी लागेल, असा अंदाज आहे. त्यानुसार रब्बीसाठी एकूण साडेचार टीएमसी पाण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळसदृश स्थितीमुळे घरगुती वापरासोबतच शेतकर्यांनीही उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन चर्चेदरम्यान करण्यात आले.
धरणांत २४ टीएमसी साठा
सध्या धरणांमध्ये अंदाजे २४ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पुणे महापालिकेने २१ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. मात्र, उपलब्ध साठ्याचा विचार करून पुण्यासाठी पुढील ऑगस्टपर्यंत १३ टीएमसी पाण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. या साठ्यातून रब्बीचे उर्वरित आवर्तन, ग्रामीण आणि शहरी पिण्याच्या पाण्याची गरज तसेच बाष्पीभवनामुळे कमी होणारे पाणी यांचाही विचार करावा लागणार आहे. पुणे शहरातील पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. शहर आणि ग्रामीण भागाने एकमेकांकडे बोटे दाखवण्याऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत समन्वयाने नियोजन करावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
उन्हाळी आवर्तनाबाबत चिंता
रब्बीचे आवर्तन पूर्ण केल्यानंतर उन्हाळ्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने आवर्तन देता येणार नाही, असे एका टप्प्यावर बैठकीतील चर्चेत सांगण्यात आले. त्यामुळे उन्हाळी हंगामातील सिंचनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पाणीबचत झाल्यास एखादे छोटे उन्हाळी आवर्तन शक्य होऊ शकेल, असा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, प्रत्येक प्रकल्पातील शिल्लक साठा आणि पुढील पाणीवापर यावर उन्हाळ्यातील परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
खरीप आणि पालखी आवर्तन
यंदा पालखीसाठी ७ ते १५ जुलै या कालावधीत पहिले आवर्तन देण्यात आले होते. त्यानंतर १६ जुलै ते २४ सप्टेंबर या काळात खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू ठेवण्यात आले. या आवर्तनात एकूण ६.३८ टीएमसी पाण्याचा वापर झाला. त्यासाठी ओव्हरफ्लोचे पाणी आणि धरणातील साठ्याचा वापर करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.