

पुणे: मुळशी धरणातील पाणी सोलापूरच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या दृष्टीने राज्यपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च करून बोगदा बांधण्याचा पर्याय पुढे आला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तत्वत: मान्यता दिली. या बोगद्याद्वारे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदी खोर्यात आणण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, बोगद्याच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणे आणि त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने थेट नदीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या प्रस्तावानुसार राज्यस्तरावर यासंदर्भात बैठकाही झाल्या.
दरम्यान, बोगद्याद्वारे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या खोर्यात आणण्याच्या प्रकल्पाचा खर्च राज्य शासन करणार की हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) या माध्यमातून उभारला जाणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, राज्य शासनाकडूनच खर्चाची तरतूद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. मुळशी धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी केला जातो. वीजनिर्मितीनंतर हे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते.
त्यामुळे पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला या पाण्याचा लाभ मिळत नाही. वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा विसर्ग कमी करून ते पाणी पूर्वेकडे वळविण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्याला तत्वत: मान्यता मिळाल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. मुळशी धरणातील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी बोगदा बांधण्याचा पर्याय विचाराधीन आहे. या कामासाठी अंदाजे ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा खर्च टीडीआरच्या माध्यमातून उभारायचा की राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यायचा, यावर अद्याप स्पष्टता नाही.
सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत
मुळशी धरणातील पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते आणि ते पश्चिमेकडे वाहून जाते. मात्र, पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक गावांना सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा विसर्ग कमी करून ते पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार पाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे दौंडसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
मुळशी धरणातील पाणी बोगद्यामार्गे पूर्व भागाला देण्याचे प्रस्तावित आहे. त्याला राज्यपातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
राहुल कुल, आमदार, दौंड