

पुणे : राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून शेतकऱ्यांना तीन वर्षांत शंभर टक्के अनुदान दिले जाते. यंदाच्या 2025-26 वर्षासाठी योजनेत तब्बल 1 लाख 8 हजार 371 अर्ज प्राप्त झाले असून, 24 हजार 238 शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे.
त्यातील सुमारे 1 हजार 515 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात नव्याने फळबाग लागवड पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी दिली.
यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत पाऊस सुरू राहिला. त्यामुळे योजनेतून सुरुवातीच्या टप्प्यात कमी लागवड दिसून येत आहे. मात्र, यंदा पाणी मुबलक असल्याने मार्च महिन्यापर्यंत फळबाग लागवड करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्य सरकारने यंदा 2025-26 साठी 104 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. त्यातील 62 कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले असून, ते मागील वर्ष 2024-25 मधील देय अनुदानासाठी दिले जातील. उर्वरित 42 कोटी रुपये अद्याप येणे बाकी आहेत. मागील वर्षीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदान रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.
दरम्यान, मंजूर कार्यक्रमाव्यतिरिक्त चालू वर्षासाठी 91 कोटी रुपये जादा अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. म्हणजेच चालू वर्षीचा एकूण कार्यक्रम पूर्वीचे मंजूर 104 कोटी आणि नवीन 91 कोटी मिळून 195 कोटी रुपये होईल. त्यापैकी रक्कम वेळेत आल्यास प्रथम वर्षासाठी 50 कोटी रुपये इतक्या अनुदानाचे वाटप पूर्ण करण्यात येईल. तर जुनी आणि नवीन मागणीनुसार अनुदान कार्यक्रम मंजूर झाल्यास राज्यात 21 ते 22 हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने फळबाग लागवड होण्याची अपेक्षा असल्याची माहितीही माने यांनी दिली.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत आंबा, काजू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, नारळ, अंजीर, आवळा, सिताफळ, जांभूळ, चिंच, फणस व कोकम ही 16 बहुवार्षिक फळपिकांची कलमे-रोपांद्वारे लागवड करता येते.