

पुणे : हडपसर येथील रेल्वे टर्मिनलचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, अत्याधुनिक रेल्वे टर्मिनलने आकार घेतला आहे. परंतु, प्रवाशांना तिथपर्यंत ये-जा करण्यासाठी असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मात्र बोंबाबोंब झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, याच वेळी पीएमपीच्या बससाठी येथे जाणारा रस्ता अरुंद असल्याने प्रवासी सेवा पुरवताना अडचणी येत असल्याचेही समोर आले.
पुणे रेल्वेस्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी हडपसर येथील रेल्वेस्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करण्यात येत आहे. भव्य अशा इमारती, सर्व पायाभूत सुविधा, अत्याधुनिक यंत्रणांनी हे स्थानक आता सज्ज झाले आहे. शेवटची काही कामे झाल्यावर ते प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज असेल. मात्र, सोमवार, 1 डिसेंबरला केलेल्या पाहणीच्या वेळी येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची पुरती बोंबाबोंब असल्याचे समोर आले. टर्मिनल पर्यंतचा रस्ता खूपच अरुंद आहे. त्यामुळे पीएमपीच्या बस तिथपर्यंत जाताना अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.
हडपसर रेल्वे स्थानकावरून सध्या गाड्यांसोबतच प्रवासी संंख्याही वाढत आहे. त्यांच्या नियोजनासाठी आरपीएफ जवानांची संख्या अपुरी पडत आहे, त्यात वाढ व्हावी, असे हडपसर येथील आरपीएफ निरीक्षक अशोक जटाव यांनी बोलताना सांगितले.
हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. यात सर्क्युलेटींग एरिया, चार नवीन इमारती, आरपीएफ कार्यालय, व्हीआयपी लाउंज, फुट ओव्हर बीज, स्काय वॉक, प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे, बुकींग ऑफीस, पार्सल ऑफीस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी सुविधा, प्रतीक्षालये, भव्य प्रवेशद्वार व अन्य काही सुविधा पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित काम जोरात सुरू आहे.
हडपसर रेल्वे टर्मिनलच्या कामाची सोमवारी सायंकाळी डीआरएम राजेशकुमार वर्मा यांनी पाहणी केली. आकार घेत असलेल्या स्थानकाची पाहाणी करताना त्यांनी येथे सूक्ष्म निरीक्षण करून येथे कामकाजासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना केल्या. तसेच, कामे तातडीने पूर्ण करण्यासह चांगल्या दर्जाची (क्वालिटी) करण्याच्या सक्त सूचना त्यांनी केल्या.
आमच्याकडून हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी रोज एक बस सुरू आहे. रेल्वेच्या मागणीनुसार आम्ही अतिरिक्त गाड्याही पाठवत असतो. आणखी मागणी असल्यास गाड्या वाढवू. बस गाड्या ये-जा करताना अरुंद रस्त्यामुळे काही अडचणी येत आहेत. त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर काम सुरू आहे.
किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल
पीएमपीला येथे प्रवासी सुविधेसाठी गाड्या वाढवण्याबाबत आम्ही पत्र दिले आहे. येथे बस थांब्यासाठी सर्व्हे देखील केला आहे. तसेच येथील टर्मिनलला ये-जा करण्यासाठी रस्ता अरुंद आहे. त्याबाबत उपाययोजना व्हाव्यात, अशा मागणीचे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे.
हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग