

पुणे : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेश रद्द करून एनडीएमध्ये जाण्याचे ठरवल्यावर सिद्धी जैनने हवाई दलात करिअर करण्याच्या स्वप्नाला प्राध्यान्य दिले. तिने दुसऱ्याच प्रयत्नात एनडीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या शैक्षणिक तीक्ष्णता, क्षेत्रीय कामगिरी, नेतृत्वगुण व सेवेच्या भावनेमुळे रविवारी 149 व्या अभ्यासक्रमाचे राष्ट्रपतींचे कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट ठरली आहे.
खेत्रपाल स्टेडियमच्या प्रतिष्ठित ड्रिल स्क्वेअरवर, वरिष्ठ लष्करी नेते, अभिमानी पालक आणि शेकडो मार्चिंग कॅडेट्सच्या उपस्थितीत सिद्धीला तीन वर्षांच्या तीव प्रशिक्षण, सतत शिस्त आणि पुरुष कॅडेट्ससोबत खांद्याला खांदा लावून स्पर्धा करणारे पदक मिळाले. त्यासोबतच तिने सर्वोत्तम अष्टपैलू एअर कॅडेट होण्याचा मानही मिळवला.
सिद्धी ही उत्तर प्रदेशातील उझानीची रहिवासी असून, अनेक लष्करी कुटुंबांप्रमाणे पिढ्यान्पिढ्या गणवेश घालणाऱ्या अन् शिक्षित कुटुंबातून आली. तिची आई तृप्ती जैनने तिला देशभरातील मुलींसाठी प्रेरणास्थान म्हटले. तिने हे सिद्ध केले की संधी मिळाल्यास महिला काहीही साध्य करू शकतात. सिद्धी गणवेश घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणींसाठी एक आदर्श ठरली. सिद्धी तिच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यासाठी डुंडीगल येथील हवाई दल अकादमी (एएफए) मध्ये जाईल. तिथून तिला भारतीय हवाई दलात नियुक्त केले जाईल. ती केवळ पदकच नाही तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तरुणींना प्रेरणा देणारा वारसा देऊन जाईल.
सिद्धीसाठी हा क्षण पदकापेक्षाही जास्त भावनिक होता. ती म्हणाली, मी एनआयटीमध्ये प्रवेश घेतला, पण जेव्हा माझे नाव एनडीएच्या गुणवत्ता यादीत आले तेव्हा मी अभियांत्रिकीच्या जागी एनडीएची निवड केली. कारण माझ्या आतल्या आवाजाने मला इथे आणले, पुरस्कार स्वीकारताना तिथे उभे राहणे अविश्वसनीय होते. मी असा क्षण कधीच कल्पना केला नव्हता. माझ्या मनात इतके विचार येत होते आणि मला फक्त कृतज्ञता वाटत होती.
एनडीएच्या इतिहासात पहिले राष्ट्रपतीपदक मिळवणारी महिला कॅडेट सिद्धी जैन.