

वेल्हे : गेल्या तीन आठवड्यात खडकवासला जलसंपदा विभागाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात पानशेत, वरसगाव व खडकवासला धरण क्षेत्रासह मुठा कालव्यावरील पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. या धडक मोहिमेत खडकवासला धरण चौपाटी व इतर ठिकाणच्या अडीचशेहून अधिक टपऱ्याही हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे खडकवासला धरण तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर झाली आहे.
खडकवासला, वरसगाव पानशेत धरण परिसरासह खडकवासला धरणा खालील मुठा कालवा रस्ता, कालव्याचा परिसर, मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील बेकायदा बांधकामे, टपऱ्या, दुकाने अशा अतिक्रमणांवर हातोडा फिरवला जात आहे. सर्वात अधिक कारवाई खडकवासला धरण क्षेत्रात करण्यात आली आहे. खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, कुडजे, मांडवी खुर्द आदी ठिकाणी अलिशान बंगल्याची पाणलोट क्षेत्रातील बेकायदा बांधकामे, हॉटेल, रिसॉर्ट अतिक्रमणे भुईसपाट करून जलसंपदा विभागाच्या सरकारी मालकीची जमीन मोकळी करण्यात आली.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्या नेतृत्वाखालील जेसीबी मशिनसह पथकाने अतिक्रमणे भुईसपाट करण्याची धडक मोहीम राबवली. त्यात हॉटेल, रिसॉर्ट फार्म हाऊस, टपऱ्या मालकांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी त्यासाठी मुदत मागितली आहे.
पुणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, पुणे पाटबंधारे मंडळ तसेच खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे, शाखाधिकारी गिरिजा कल्याणकर, प्रतीक्षा मारके, रोहन ढमाले, सुमीत धामणे आदी अधिकारी तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या सहकार्याने व जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व बेकायदा बांधकामे भुईसपाट करेपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
बड्या राजकीय नेत्यांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी थेट दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातच अतिक्रमण केले आहेत. त्यावर ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळातच दबंग कारवाई केली. त्याचा मोठा धसका या अतिक्रमण धारकांनी घेतला आहे. राज्य सरकारने जलसंपदा विभागाला अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका,भूमिअभिलेख आदी विभागाना मदत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रथमच जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण कारवाईत विविध विभागांचे अधिकारी, सुरक्षारक्षक कर्मचारी सहभागी झाल्याचे दिसले.
तिन्ही धरणांच्या तीरावरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सरकारी मालकीच्या जमिनींवर बंगले, हॉटेल, रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली. काही मालकांनी आमिषे दाखवली, मात्र त्याला न जुमानता कारवाई सुरू आहे. कारवाईला स्थगिती देण्यात यावी, यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. मात्र मंत्री, नेते मंडळी नगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय असल्याने वरिष्ठ पातळीवरून कोणीही दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेवर मागील तीन आठवड्यांपासून पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण क्षेत्रातील सरकारी जमिनीवरील, तसेच पुणे शहर हद्दीतील कालव्यालगतची बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, खडकवासला