…तर दीदी पंतप्रधान झाली असती!

Asha Bhosale
Asha Bhosale
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'लतादीदीची बुद्धी खूप कुशाग्र होती. शिकली असती, तर माझी दीदी पंतप्रधान झाली असती. वयाच्या तेराव्या वर्षी ती आमची वडील झाली, म्हणून तिला शिकता आले नाही. तिने मला लहान बाहुलीसारखे सांभाळले,' असे भावोद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी
पुण्यात काढले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सारसबागेजवळील भव्य गणेश कला क्रीडा मंचात ही सभा झाली. फक्त निमंत्रितांसाठी ही सभा होती. तरीही सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त उषा मंगेशकर, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, एमआयटीचे विश्वशांती विद्यापाठाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त व वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

व्यासपीठामागे बसल्या होत्या आशा भोसले..

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले व्यासपीठावर उपस्थित नव्हत्या. त्यांचे नाव घेताच श्रोत्यांना वाटले आता उषा मंगेशकर बोलतील. सूत्रसंचालन करणार्‍याने चुकून त्यांचे नाव पुकारले असावे. मात्र, डॉ. धनंजय केळकर यांनी 'आशा भोसले' असे नाव उच्चारताच आशाताई डोळे पुसत व्यासपीठाच्या मागून समोर आल्या. त्यांनी व्यासपीठावरील लतादीदींच्या फोटोला नमस्कार केला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, 'तुमच्या सर्वांसाठी लता मंगेशकर गेल्या, पण आमच्यासाठी आमचे वडील गेले, आमचे सर्वस्व गेले. माझे वडील गेल्यावर तेरा वर्षांची दीदी आमचे वडील झाली. तिने मला तर बाहुलीसारखे सांभाळले.'

भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पंडित हृदयनाथ मंगेशकर, मोहन भागवत, उषा मंगेशकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आदी मान्यवर.
भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पंडित हृदयनाथ मंगेशकर, मोहन भागवत, उषा मंगेशकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आदी मान्यवर.

भागवत यांनी जागवल्या आठवणी

'लतादीदी इतक्या साध्या होत्या की त्या इतक्या मोठ्या आहेत, आपण त्यांच्याशी काय बोलावे, असा संकोच कधी कोणालाही झाला नाही. मला गाण्यातले काही कळत नाही. म्हणून मी त्या जेव्हा नागपूरला आल्या होत्या, तेव्हा आमच्या वर्‍हाडी मिरचीच्या भाजीविषयी बोललो, पण त्या स्पष्ट म्हणाल्या, ही भाजी मी खाणार नाही,' अशी आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली.

ते म्हणाले, 'मंगेशकर कुटुंबीयांवर हा वज्राघातच आहे. कसे सांत्वन करावे, काय बोलावे कळत नाही. त्यांचा स्वर ईश्वरदत्त होता. हिमालयाच्या उंचीच्या त्या होत्या. त्यांना शिक्षण घेता आले नाही, पण त्या शिकल्या असत्या, तर देशातील उत्तुंग विद्वानांच्या रांगेत नक्कीच असत्या; पण त्यांचा जन्म काही साधासुधा नव्हता. ईश्वराच्या दरबारात फार कमी माणसे असतात, ज्यांचा पुन्हा जन्म होतो तो काही विशेष कार्यासाठी. त्या व्यक्तींपैकी एक लतादीदी होत्या.'

या कार्यक्रमात सुरुवातीला आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, एमआयटी विश्वशांती विद्यापाठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द गायक रूपकुमार राठोड यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांनीही श्रद्धांजली सभेत लतादीदींविषयीच्याआपल्या आठवणी जागवल्या.

हृदयनाथांचा कंठ दाटून आला…

पंडित हृदयनाथ मंगेशकर काठीचा आधार घेत हळूवारपणे बोलण्यासाठी माईकजवळ आले, पण दीदींच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला. स्वत:ला आवरत पाणावलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, 'मी ऐंशी वर्षे दीदीसोबत राहिलो, तरी ती मला समजली नाही.' इतके बोलून थरथरत्या हाताने काठी हातात घेत ते आपल्या आसनावर येऊन बसले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news