

पंकज खोल
पिंपरी : उद्योग-व्यवसायांमुळे भरभराटीस आलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योगातील मालाची ने-आण करण्यासाठी निगडी येथे सुमारे 32 एकरांमध्ये ट्रान्स्पोर्टनगरी उभारली आहे; मात्र या ट्रान्स्पोर्टनगरीस गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या सुविधा, चोरट्यांचा आणि मद्यपींचा त्रास तसेच परराज्यातून येणाऱ्या वाहनचालकांसाठी असुरक्षित वातावरण आहे. या गैरसुविधांमुळे व्यावसायिक व वाहनचालक त्रस्त आहेत. येथील परिस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
शहराच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजेच निगडी भक्ती-शक्ती चौकालगत ट्रान्स्पोर्टनगरी विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. मूलभूत सुविधांचा येथे अभाव आहे. गर्दुले व मद्यपींचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चालक सांगतात. या ठिकाणी फिरणेही आतात धोकादायक झाले असल्याने व्यावसायिक व वाहनचालक सांगतात. केवळ जिल्ह्यातून नव्हे, तर विविध राज्यांतून या ठिकाणी वाहने येत असतात. उद्योगातील मालाची ने-आण करणे यादरम्यान चालक थोडा आराम, विश्रांती घेतात; मात्र सध्या रात्रीच्या वेळी मद्यपी मंडळी ट्रान्स्पोर्टनगरीत येऊन धिंगाणा घालत असल्याने चालकांना विश्रांती घेणेही मुश्कील झाले आहे.
औद्योगिक चक्र चालण्यासाठी व शहरातील अर्थव्यवस्थेला गती देण्यास ट्रान्स्पोर्टनगरी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उद्योगातील सर्व प्रकारच्या साहित्याची ने-आण करणारी हलकी व अवजड माल वाहतूक वाहने या ट्रान्स्पोर्टनगर येथे थांबतात. त्याचप्रमाणे तरकारी, छोटी वाहने त्या परिसरातील वाहनेदेखील या ठिकाणी येत असतात. देशाच्या विविध राज्यांतून येथून मालवाहतूक केली जाते.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने येथे पार्किंग सुविधा निर्माण केली आहे. मात्र, ती अपुरी पडत असल्याने मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ही माल वाहतूक वाहने थांबलेली असतात. परिणामी, या रस्त्यावर अपघाताचीदेखील भीती व्यक्त करण्यात येते. 700 ते 750 वाहने ये-जा करतात. मात्र, विविध भागातून येणाऱ्या या वाहनचालक व मदतनीस यांना येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान 32 एकरात ट्रान्सपोर्टनगर पसरले आहे. ट्रान्स्पोर्टनगरीत दोनच ठिकाणी स्वच्छतागृह, स्नानगृहाची सुविधा आहे; तसेच सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीदेखील सुविधा नाही. ट्रान्सपोर्ट नगरीच्या शेवटच्या टोकाला असलेले स्वच्छतागृह बंदच असते, अशी माहिती येथील वाहनचालकांनी दिली. परिसरातील कचरादेखील वेळेवर उचलला जात नसल्याचेही सांगण्यात आले.
सभासद : 5000
दररोजची वाहने : 700 ते 750
एकूण जागा : 32 एकर
देशपातळीवरील वाहने : 100 ते 150
रात्रीच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी वाहने घेऊन चालक येतात. सायंकाळी सातनंतर परिसरात तृतीयपंथी चालकांना त्रास देतात. एवढेच नव्हे, तर चोरट्यांचाही सुळसुळाट असून, गाड्यांच्या बॅटरी, इतर साहित्य, मोबाईल, स्टेपनी, दोरखंड, पाने, वाहनांचे पार्टस् असे साहित्य लंपास करतात. ट्रकचालक लांबून येऊन येथे जेवण बनवतात त्यावेळी तेथे तृतीयपंथी त्रास देत असल्याचे चालकांनी सांगितले.
शहरालगतच निगडी येथे 1986 ते 87 दरम्यान या ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सुरू होण्यास 1992 या ठिकाणी वाहने पार्क होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वाहनांची वाढती संख्या, वाढती एमआयडीसी आणि वाहतूकदारांची संख्यादेखील वाढत असल्याने विस्तारीकरण करण्यासाठी 70 एकर जागा आवश्यक आहे. ट्रान्सपोर्टनगरीसाठी खरे पाहता, 110 एकर जाग मिळेल असे सांगण्यात आले होते; परंतु 32 एकरच जागा देण्यात आली होती.
ट्रान्सपोर्ट नगरीत विविध समस्या आम्ही पालिका प्रशासनासमोर मांडत असतो. चोरीमुळे अनेकदा येथे येणाऱ्या चालकांना जागेच राहावे लागते. पोलिस प्रशासन, पालिकेकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. पार्किंगची सुविधा अपुरी असल्याने इतर 250 ते 300 गाड्या रस्त्यावर पार्क केल्या जातात. या संदर्भात आम्ही कमिटीची बैठक घेणार असून, या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
दिलीप देशमुख, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड ट्रान्सपोर्ट असोसिएशन
या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता केली जाते. तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. आणखी काही समस्या असल्याचे त्यादेखील पाहणी करून दूर केल्या जातील.
निवेदिता घार्गे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका