बारामतीत नवीन कंपन्या येण्याची गरज; वाहननिर्मिती उद्योगाची आवश्यकता

बारामतीत नवीन कंपन्या येण्याची गरज; वाहननिर्मिती उद्योगाची आवश्यकता
Published on
Updated on

अनिल सावळे पाटील
जळोची : सर्वच क्षेत्रात बारामतीचा विकास होत असताना अजूनही बारामती एमआयडीसीमध्ये आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या येण्याची गरज आहे. त्यामुळे युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी युवावर्गाकडून होत आहे.

पियाजिओ व्हेईकल्स, श्रायबर डायनॅमिक्स डेअरी, भारत फोर्ज, फेरेरो, बाउली, आयएसएमटी यासारख्या नामांकित कंपन्या व इतर छोट्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. परंतु बेरोजगार युवकाची संख्या मोठी असल्याने व एमआयडीसीकडे भरपूर क्षेत्र रिकामे असल्याने नवीन कंपन्यांना जागा सहज उपलब्ध होऊ शकते, त्यातून अनेक छोटे-मोठे युवा उद्योजक तयार होऊ शकतात. सध्या एमआयडीसीमध्ये सुमारे 500 प्लॉट रिकामे आहेत.

रोजगार निर्माण करू शकणार्‍याच लघुउद्योगांना संजीवनी देणार्‍या मोठ्या प्रकल्पांची गरज निर्माण झाली आहे. बारामती एमआयडीसीची स्थापना 12 डिसेंबर 1988 मध्ये करण्यात आली होती. जवळपास 812 हेक्टर जमिनीवर एमआयडीसीची स्थापना झाली. 915 औद्योगिक प्लॉटपैकी अंदाजे 400 प्लॉटवर उद्योग सुरू असून, उर्वरित प्लॉट अद्यापही रिकामेच आहेत. ऑर्टन, स्पेन्टेक्स, मुकुट पाईप्स यासारखे मोठे उद्योग बंद पडले आहेत, त्यांच्या जागा अद्याप "जैसे थे "आहेत.

बारामती परिसरातील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा व लघुउद्योगाच्या माध्यमातून काही नवउद्योजक तयार व्हावेत, या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या एमआयडीसीची निर्मिती केलेली होती. आज या एमआयडीसीमध्ये हायटेक टेक्स्टाईल पार्क, फेरेरो कंपन्यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती झाली, परंतु टेक्स्टाईल पार्कमध्ये अनेक रिकामे प्लॉट आहेत. त्या ठिकाणी सुद्धा नवीन उद्योजक येणे गरजेचे आहे.

एमआयडीसीमध्ये काही मोजके उद्योग सोडले तर इतर बहुसंख्य लघुउद्योजकच बारामतीतील आहेत. जागतिक मंदी व कोरोनाचा फटका बारामतीच्या लघुउद्योजकांनाही बसला आहे . मागणीचा अभाव असल्याने उत्पादनावर परिणाम झाला की त्याचा फटका लघुउद्योजकांना सहन करावा लागतो. बारामतीतील एकट्या पियाजिओ कंपनीवर 70 टक्के लघुउद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे पियाजिओच्या उत्पादनावर अनेकांचे भवितव्य अवलंबून राहते. याला पर्याय म्हणून बारामतीत एखादा वाहन उद्योग असणे गरजेचे आहे असे अनेकांना वाटते.

बारामती एमआयडीसीला एखाद्या वाहननिर्मिती क्षेत्रातील उद्योगाची गरज आहे. लघुउद्योगांना चालना देण्यासाठी असा उद्योग गरजेचा आहे. असा एखादा उद्योग सुरू झाला, तर त्याचा फायदा अनेक उद्योजकांना निश्चित होईल.

              -धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

कोरोनानंतर बारामती एनआयडीसीतील लघुउद्योजकांची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे, त्यासाठी नव्या उद्योगाची गरज आहे. त्यातून जुन्या उद्योजकांना काम मिळेल. शिवाय नवीन उद्योजक तयार होऊन रोजगार निर्मिती होईल.

            -प्रमोद काकडे, अध्यक्ष, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news