

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना दिलेला शब्द कधीही मोडत नाही, असा दावा करत माजी खासदार संभाजीराजे यांनी नामी संधी गमावली, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला नाही. ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. मला शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली. परंतु त्यास मी नकार दिला, असा खुलासा संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावर खासदार सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कार, विचारावर शिवसेना चालते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे दिलेला शब्द मोडला, असे कधीच होणार नाही. शिवसेना पुरस्कृत राज्यसभेचा उमेदवार उभा करणार आहे, अशी कोणतीही बातमी आली नाही, असे सावंत म्हणाले.
गेल्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला दोन जागा देण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या आग्रहाला मान देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना एक उमेदवार दिला. तेव्हा राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार म्हणून फौजिया खान यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार राज्यसभेवर गेले. आता आम्हाला दोन सदस्य पाठवण्याची संधी आली होती. त्यामुळे शिवसेनेचे दोन राज्यसभा खासदार जात असतील, तर ते शिवसेनेचे असायला हवेत. हा विचार पक्ष आणि संघटना म्हणून महत्त्वाचा असल्याने एका कडवट शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली, असे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी शिवसेनेने शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. त्यासाठी त्यांना सोमवारी (दि.२३) दुपारी बारा वाजेपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, याकाळात संभाजीराजे यांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पवार यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेतात, त्याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, संभाजीराजेंनी मुंबई मराठी पत्रकार संघात सकाळी ११ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील वाटचालीविषयी दिशा स्पष्ट केली.
शिवसेनेत प्रवेश करावा, उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने दिली होती. पण मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही. मला घोडेबाजार करायचा नाही. मला सर्व पक्षांनी मदत करावी, अशी मला अपेक्षा होती. माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही. माझ्यासाठी माझा विचार आणि जनता महत्वाची असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
हेही वाचलंत का ?