पालिकेच्या मिळकती परस्पर भाडेतत्त्वावर; औंधमधील हॉल सील करण्याचे आदेश

पालिकेच्या मिळकती परस्पर भाडेतत्त्वावर; औंधमधील हॉल सील करण्याचे आदेश
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या मिळकती माननीय बेकायदा वापरत असल्याचे, तसेच या मिळकती भाड्याने दिल्या जात असल्याचे प्रकार उजेडात आल्याने महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोंढव्यातील एक हॉल परस्पर भाड्याने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, तर औंधमधील एक हॉल सील करण्याचे आदेश दिले आहेत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने मिळकतींच्या एकत्रित नोंदी घेण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये मागील काही महिन्यांत कामे पूर्ण झालेल्या 57 मिळकती अद्याप मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. या मिळकतींचा वापर माननीयांच्या वतीने परस्पर सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे.

विशेषत: आता नगरसेवकपद नसतानाही ते या मिळकतींचा व्यावसायिक वापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्याविरोधात कडक पावले उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिले आहेत. कोंढव्यातील माजी नगरसेवक आपल्या निधीतून विकसित केलेला हॉल लग्नकार्यासाठी देत असल्याची तक्रार दुसर्‍या पक्षातील माजी नगरसेवकाने केली होती. त्यानुसार मालमत्ता विभागाने तक्रारीची खातरजमा केल्यानंतर हे काम परस्पर गेल्या चार महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर हा हॉल सील करण्यात आला. मात्र, त्यानंतर माजी नगरसेवकाने हॉलचे सील परस्पर काढून पुन्हा हॉलचा वापर सुरू केला. यामुळे आयुक्तांनी या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने नगरसेवकांची 'धावपळ' सुरू झाली आहे.

हॉल सील करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

औंधमधील एका माजी माननीयांच्या प्रयत्नांतून विकसित झालेल्या हॉलमध्ये परस्पर महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. या हॉलचा बेकायदा वापर सुरू असल्याची तक्रार त्याच माननीयांच्या पक्षातील पदाधिकार्‍याने केली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी हॉल सील करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news