सांगली : विधवा प्रथा बंदीची प्रभावी अंमलबजावणी गरजेची | पुढारी

सांगली : विधवा प्रथा बंदीची प्रभावी अंमलबजावणी गरजेची

सांगली : राज्य सरकारने विधवा प्रथा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज समाजातील विविध स्तरांतून उमटली. विधवांना समाजाकडून अवहेलना सहन करावी लागते. याला पायबंद बसेलच, मात्र याचबरोबर या विधवांना आर्थिक आघाडीवर सक्षम बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.

अंमलबजावणी प्रभावी व्हावी

हा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. महात्मा फुले यांनी 175 वर्षांपूर्वी विधवांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पावले उचलली होती. सरकारने आता माणगाव, हेरवाड गावांनी निर्णय घेतल्यानंतर केवळ असे ठराव घ्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. खरे तर याबाबतचा कायदा करणे गरजेचे आहे.
– अ‍ॅड. के. डी. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते

विधवांना भावनिक आधार

आजही विधवांची रूढी-परंपरा यामुळे दोष नसतानाही अवहेलना होते. विधवा प्रथा बंदीचा हेरवाड पॅटर्न राज्यभर राबविण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश कौतुकास्पद आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन रॉय आदींनी सती प्रथा बंद केली. त्यावेळी लॉर्ड बेंटिंगसारख्या इंग्रज अधिकार्‍यांनीही त्यांना साथ दिली. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. विधवांना यातून भावनिक आधार मिळणार आहे.
– डॉ. सुषमा नायकवडी, जि. प. सदस्या

आता समाजाने पुढाकार घेण्याची गरज

गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिगेड व साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही समाजातील चुकीच्या प्रथा, रूढी-परंपरा, चालीरिती बदलण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. हेरवाड, माणगावने अतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनेही याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी आहे. यासाठी सर्व समाजाने साथ देण्याची गरज आहे.
– डॉ. निर्मला पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा

सुरुवात तर झाली

हा निर्णय खूपच चांगला व स्वागतार्ह आहे. अर्थात याला खूप उशीर झाला आहे. पण ही सुरुवात झाली आहे. अजून खूप पल्ला गाठावा लागेल. यासाठी समाजाने एकत्रित काम करण्याची गरज आहे.
– अर्चना मुळे, सामाजिक कार्यकर्त्या

बदलाची सुरुवात व्हावी

घटनेच्या विरोधातील सर्व अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत. अजूनही ग्रामीण भागात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली जाते. एखाद्या महिलेला मुलगा नसेल, तरीही तिला मान मिळत नाही. याला काही प्रमाणात स्त्रियाच जबाबदार असतात. या प्रथा सुरू ठेवण्यासाठी स्त्रियाच स्त्रियांचा छळ करीत असतात. स्त्रियांनी स्वत:पासून बदल सुरू केला पाहिजे.
– प्रा. नंदा पाटील, सामाजिक कायकर्त्या

अंनिसतर्फे प्रबोधन करणार

हेरवाडने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पतीच्या निधनानंतर स्त्रीचे जे विकृतीकरण केले जाते, त्याला या निर्णयाने आळा बसणार आहे. अंनिसच्यावतीने आम्ही शासनाच्या सहभागाने प्रत्येक गावात जावून प्रबोधन करू. सर्व गावांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
– ज्योती आदाटे, कार्याध्यक्ष, अंनिस, प्रियंका तुपलोंडे

हा निर्णय देशभर गरजेचा

हेरवाड गावाने घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. पती निधनानंतर त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी समाजाने अशा चुकीच्या प्रथा टाकून दिल्या पाहिजेत. हा निर्णय संपूर्ण देशात राबविण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहे.
– सुरेश पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button