कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस | पुढारी

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

पुणे : आशिष देशमुख कर्नाटकात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने दक्षिण भारतात तुफान मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्याच्या काही भागांतही हवेचा दाब कमी झाल्याने पाऊस पडत आहे. मात्र, राज्यात बहुतांश भागांत हवेचा दाब जास्त असल्याने तेथे पाऊस नाही. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. मान्सून अंदमान ते अरबी समुद्राच्या वाटेवर असला, तरीही तो भारतीय किनापट्टीपासून दूर आहे.

मात्र, दक्षिण भारतात हवेचा दाब 1 हजार हेक्टा पास्कल इतका कमी झाल्याने त्या भागात अतिवृष्टी होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात सध्या हवेचा दाब असमान असल्याने कुठे पाऊस, तर कुठे अतिउकाडा जाणवत आहे. यंदा अंदमानात मान्सून 16 मे रोजी नियोजित वेळेच्या पाच ते सहा दिवस आधीच दाखल झाला. तो अजूनही अंदमान आणि बंगालच्या उपसागरात असून, अरबी समद्राच्या वाटेवर आहे. भारतीय किनारपट्टीपासून अजूनही खूप लांब असून, दक्षिण भारतात मान्सून बरसावा इतकी अतिवृष्टी होत आहे. दक्षिण भारतात हवेचा दाब खूप कमी झाल्याने बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्‍त वारे वेगाने दक्षिण भारतात आले. त्यामुळे तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्वच्या जलधारा बरसत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रात असमान दाब

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले की, दक्षिण भारतात अतिवृष्टीचे मुख्य कारण हवेचा कमी दाब हेच आहे. त्या भागात हवेचा दाब खूप कमी म्हणजे 1000 हेक्टा पास्कलपेक्षाही खूप कमी झाल्याने तिकडे बाष्पयुक्‍त वारे बंगालच्या उपसागराकडून वेगाने पोहोचले आणि अतिवृष्टी होत आहे. महाराष्ट्रात मात्र हवेचा दाब 1004 हेक्टा पास्कल व त्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कुठे पाऊस, तर कुठे प्रचंड उष्णतेची लाट दिसत आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यात परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद या भागांत हवेचा दाब कमी झाल्याने पाऊस पडत आहे. त्या तुलनेत विदर्भासह मध्य पुणे शहरातही हवेचा दाब जास्त आहे. शिवाय पुणे शहरात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन जास्त आहे. त्याचाही परिणाम पावसावर होत आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button