चौकशी चालू असतानाच ‘स्वयंभू’ला मुदतवाढ | पुढारी

चौकशी चालू असतानाच ‘स्वयंभू’ला मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील कचरा वाहतूक करणार्‍या स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या कामांची चौकशी सुरू असतानाच महापालिकेने पुन्हा या ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे प्रशासन या ठेकेदारावर एवढे मेहरबान का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या विविध प्रभागांतील कचरा वाहतुकीचे काम छोट्या घंटागाडीच्या माध्यमातून वाहतूक करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराकडे आहे. या ठेकेदाराच्या कचरा वाहतुकीच्या बिलात कोट्यवधी रुपयांची अनियमितता झाल्याची तक्रार असून, याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे.

असे असतानाच या ठेकेदाराला पुन्हा नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीस ठेवला आहे. या कामासाठी 93 लाख 79 हजार रुपये खर्च होणार आहे. स्थायी समितीने पूर्वी मंजूर केलेल्या दरानुसार वाहनांच्या फेर्‍यानुसार ठेकेदाराला ही बिले अदा केली जाणार आहेत. याबाबत वाहतूक विभागाचे उपायुक्त महेश डोईफोडे म्हणाले, ‘कचरा वाहतुकीसाठी वाहन विभागाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही निविदा कचर्‍याच्या वजनावर असणार आहे. मात्र, ही निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब होत असल्याने स्वयंभू ट्रान्सपोर्टला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला.

हेही वाचा :

 

Back to top button