Khed Taluka Stone Pelting: मतदानाच्या पूर्वसंध्येला खेड तालुक्यात दगडफेक; राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर हल्ला
राजगुरुनगर: जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गटात शुक्रवारी (दि ६ ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली. या हल्ल्यात स्कॉर्पिओ गाडीवर (क्र. एमएच १४ एलयू ७०७४) अनोळखी इसमांनी दगडफेक केल्याने गाडीच्या फुटल्या. आणि गाडी चालवत असलेल्या शरद आनंदराव बुट्टे पाटील (वय ४९, रा. वराळेगाव, ता. खेड) यांच्या कपाळावर दगड लागून गंभीर जखम झाली. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र संदीप सुदाम मिरजे यांनाही किरकोळ दुखापत झाली.
संदीप सुदाम मिरजे यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे मित्र शरद बुट्टे पाटील हे रात्री ८ वाजता खेड येथून निघाले होते. ते आपला आजारी मित्र राहुल तरडे (रा. आसखेड) यांना भेटण्यासाठी शरद बुट्टे पाटील यांच्या स्कॉर्पिओ गाडीने आसखेड गावात गेले. राहुल तरडे हे साळुंखे हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे कळल्याने चहापाणी करून ते सुमारे रात्री ८.४५ वाजता धामणे गावाकडे निघाले.
आसखेड ते धामणे रस्त्यावर , आसखेड-धामणे गावाजवळील शिवे परिसरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर दगड पडलेले पाहून शरद बुट्टे पाटील यांनी गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवली. त्याचवेळी धामणे गावाकडून येणाऱ्या दिशेने २ ते ३ अनोळखी इसमांनी १०-१५ फूट अंतरावरून गाडीवर ५ ते ६ ओबडधोबड दगड फेकले. यामुळे स्कॉर्पिओची काच फुटली. दोघेही डोके खाली घालून बसले असताना एक दगड शरद बुट्टे पाटील यांच्या कपाळावर लागला. मागून येणाऱ्या टू-व्हीलरच्या हेडलाइटमुळे प्रकाश पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. अंधारामुळे त्यांची ओळख पटली नाही.
संदीप मिरजे गाडीतून उतरताना पडले आणि त्यांनाही कपाळावर किरकोळ जखम झाली. जवळच येणाऱ्या टू-व्हीलर चालकाने मदत केली. नंतर ओळखीच्या लोकांना फोन करून बोलावले आणि दोघांना बालाजी हॉस्पिटल, भांबोली येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर संदीप मिरजे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून, शरद बुट्टे पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामागे कोणती कारणे आहेत याचा तपास सुरू असून, अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडली असून, शरद बुट्टे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.

