

पुणे: राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. सुधारित संचमान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि. 23-10-2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार डिसेंबर 2025 मध्ये शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतापर्यंत 2024-25 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होती; परंतु उच्च न्यायालयाने सर्व याचिका आता निकाली काढलेल्या आहेत. त्यामुळे 2025-26च्या संचमान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी 13 फेबुवारीला घोषित करावी लागणार आहे.
सन 2024-25च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हास्तरावरील कार्यवाही 3 मार्चपर्यंत करावी लागणार आहे. जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यांनतर रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि. 10 मार्चपूर्वी सादर करणे गरजेचे आहे.
वेळापत्रकाची जिल्हास्तरावर अशी होणार कार्यवाही
रिक्त जागांची आणि अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे - 13 फेबुवारी
आक्षेप- हरकती घेणे - 20 फेबुवारी
रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे - 25 फेबुवारी
समुपदेशनाद्वारे समायोजन करणे - 3 मार्च
विभागस्तरावर अशी होणार कार्यवाही
विभागस्तरावर यादी जाहीर करणे - 6 मार्च
विभागस्तरावरील रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्तानिहाय) तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्तपुरती यादी घोषित करणे. आक्षेप / हरकती घेणे - 10 मार्च
आक्षेप - हरकती घेणे - 16 मार्च
रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे - 20 मार्च
समुपदेशनाद्वारे समायोजन करणे - 25 मार्च
राज्यस्तरावर यादी सादर करणे - 31 मार्च
शिक्षण संचालकांच्या सूचना
अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभागस्तरावर समायोजन प्रक्रिया दि.25 मार्चपर्यंत पूर्ण करावी आणि उर्वरित रिक्त पदांचा तपशील, अतिरिक्त कर्मचारी यादी संचालनालयास 31 मार्चला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करणे गरजेचे आहे. 3 मार्चपर्यंत जिल्हास्तरावरील आणि 25 मार्चपर्यंत विभागस्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून दिले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. संबंधित देयक मूळ शाळेतून दिल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे माध्यमिकचे संचालक डॉ. महेश पालकर आणि प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.