

पुणे: मैदानावरील चपळाई, ‘कबड्डी-कबड्डी’चा घुमणारा आवाज आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दैनिक ‘पुढारी’ आयोजित भव्य महिला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अत्यंत दिमाखात शुभारंभ झाला. महिलांच्या क्रीडा कौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत जिल्हाभरातील नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
दै. ‘पुढारी’च्या वतीने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ‘राईज अप : पुणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी सीझन-4’ स्पर्धेला नेहरू स्टेडियमवर दिमाखात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू शकुंतला खटावकर, राष्ट्रीय कबड्डीपटू वासंती सातव-बोर्डे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सदस्य सुभाष बोधे, के. जे. इन्फाचे संचालक विवेक जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू आर्या लवार्डे हिने खेळाडूंना शपथ दिली. या स्पर्धेचे प्रास्ताविक दै. ‘पुढारी’च्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख संतोष धुमाळ यांनी केले. इमान शेख यांनी सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक म्हणून अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.
...अशी पार पडणार स्पर्धा
खेळ आणि खेळाडूंच्या कौशल्याला दाद देण्यासाठी पुण्याच्या क्रीडाप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरली आहे. या स्पर्धेत सबज्युनिअर, ज्युनिअर आणि खुल्या, अशा तीन गटांत चुरस होणार आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये खुल्या गटातील विजेत्या संघास 21 हजार रुपये व ट्रॉफी, ज्युनिअर गटातील विजेत्यास 15 हजार रुपये व ट्रॉफी, सबज्युनिअर गटातील विजेत्यास 11 हजार रुपये व ट्रॉफी, याशिवाय बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर आणि ऑल राउंडर अशा वैयक्तिक कौशल्यांसाठीही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
दै. ‘पुढारी’ने महिला खेळाडूंसाठी चांगली संधी दिली आहे. जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घेऊन यश मिळवावे. दै. ‘पुढारी’ने महिलांसाठी मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. अशा स्पर्धांमुळे ग््राामीण भागातील गुणवंत महिला खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळते. दै. ‘पुढारी’ने दिलेले हे व्यासपीठ महिला खेळाडूंसाठी अत्यंत मोलाचे आहे.
शकुंतला खटावकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू
दै. ‘पुढारी’च्या वतीने महिलांसाठी उत्तम व्यासपीठ मिळवून दिले आहे. या ठिकाणी महिला कबड्डी संघातील खेळाडूंचा उत्साह पाहता या स्पर्धेतील सामने अटीतटीचे आणि रंगतदार होतील.
वासंती सातव-बोर्डे, राष्ट्रीय कबड्डीपटू
दै. ‘पुढारी’सारख्या माध्यमाने महिलांसाठी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात क्रीडासंस्कृती रुजवली आहे. महिलांना क्रीडा क्षेत्रातील मोठे व्यासपीठ उपलब्ध करून संधी दिलेली आहे. अशा स्पर्धांना आम्ही जोडले गेलो, याचा मोठा आनंद आहे.
विवेक जाधव संचालक, के. जे. इन्फा
दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत खूप संघांनी सहभाग घेतला आहे. आमच्या वेळी 6 किंवा 7 संघ असायचे; पण ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत तब्बल 76 संघ सहभागी झाले असून, ही ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. मुलांप्रमाणे आता मुलींचीही प्रो-कबड्डी सुरू होणार आहे. खेळामध्ये सातत्य ठेवून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर यश मिळवा. कोणतीही गोष्ट कष्टशिवाय पूर्ण होत नाही. त्याचा विचार करून मनापासून प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल.
शांताराम जाधव (अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू)