

पुणे: ‘इंडिगो’ची सेवा विस्कळीत झाल्यामुळे डीजीसीएने (विमान वाहतूक महासंचालनालय) नव्याने लागू केलेले एफडीटीएल (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन) चे नियम शिथिल केले. मात्र, आमच्या तब्येतीसह प्रवाशांच्या जिवाचा विचार प्रशासनाने केला की नाही? असा सवाल काही पायलट्सने खासगीत बोलताना केला.
नियम शिथिल; पुन्हा लागू होणार...
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पायलटचा थकवा कमी करून विमान सुरक्षा वाढवण्यासाठी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमुळे पायलटच्या कामाच्या वेळा आणि विश्रांतीच्या गरजांमध्ये सुधारणा झाली. मात्र, या बदलांकरिता इंडीगोने पूर्णत: तयारी न केल्यामुळे संपूर्ण देशभरात ही परिस्थिती उद्भवली. त्यामुळे ‘डीजीसीए’ने तात्पुरत्या कालावधीसाठी इंडिगोची विस्कळीत झालेली विमान वाहतूक पूर्वपदावर येईपर्यंत ‘एफडीटीएल’चे नियम शिथिल केले आहेत. हे नियम 10 फेबुवारी 2025 पर्यंत शिथील असणार आहेत. त्यानंतर पुन्हा नियम अधिक कडक होतील, असे हवाई वाहतूकतज्ज्ञांनी बोलताना सांगितले.
जुन्या नियमांमुळे पायलटना होणारा त्रास
जुन्या नियमांमुळे पायलटला कामाचा अधिक ताण येत होता आणि त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत होता. यात पायलटला फक्त 36 सलग तासांची साप्ताहिक विश्रांती मिळत होती. ही विश्रांती कामामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी अपुरी होती, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी आणि नवीन आठवड्याच्या सुरुवातीला पायलट थकलेले राहत होते. काही विमान कंपन्या पायलटच्या वैयक्तिक किंवा अर्जित रजेला साप्ताहिक विश्रांतीमध्ये समाविष्ट करत असत. यामुळे पायलटला खऱ्या अर्थाने विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळत नव्हता, कारण रजा आणि विश्रांतीचा उद्देश वेगवेगळा असतो. पहाटे 5 ते 6 या वेळेतही थकवा जास्त असतो. जुन्या नियमांमुळे कंपन्या या वेळेतही काम करून थकवा टाळण्याच्या नियमांचे उल्लंघन करू शकत होत्या. तसेच, मानवी जैविक घड्याळ रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी तयार असते. वारंवार रात्रीच्या वेळी काम केल्याने आणि लँडिंग्स केल्याने झोपेच्या चक्रात गंभीर अडथळा येतो. यामुळे जागृततेत घट होते, त्यामुळे कॉकपिटमध्ये गंभीर मानवी त्रुटी होण्याची शक्यता वाढत होती. परिणामी, मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे नवीन नियम लावण्यात आले आहेत.
नवीन नियमांमुळे होणारे प्रमुख फायदे
नवीन नियमांचा मुख्य उद्देश पायलटचा थकवा कमी करून विमान सुरक्षा वाढवणे हा आहे.
साप्ताहिक विश्रांतीत वाढ - सलग 48 तास (12 तासांची वाढ) वाढ केली आहे. पूर्वी सलग 36 तास असायची.
आता नवीन नियमानुसार रजा साप्ताहिक विश्रांती म्हणून वापरता येणार नाही. पूर्वी रजा साप्ताहिक विश्रांती म्हणून वापरण्याची परवानगी होती.
सलग रात्रीच्या ड्युटीवर मर्यादा आली आहे. आता फक्त 2 सलग रात्रीची ड्युटी करता येते. पूर्वी जास्त ड्युटीची शक्यता असायची. परिणामी, मोठ्या अपघाताचा धोका होता.
48 तासांची साप्ताहिक विश्रांती मिळाल्याने पायलट्सना शारीरिक आणि मानसिकरीत्या पूर्ण स्वास्थ्य मिळते, त्यामुळे त्यांची जागरूकता आणि कॉकपिटमधील कार्यक्षमता सुधारते.
रात्रीच्या कामाच्या वेळा आणि लँडिंग्सवर मर्यादा आल्याने थकव्यामुळे होणारे अपघात आणि त्रुटींची शक्यता लक्षणीय कमी होते.
...म्हणून दिली नियमाला मुदतवाढ
हवाई वाहतूकतज्ज्ञ वंडेकर म्हणाले, ‘डीजीसीए’ने दिलेली ही सवलत केवळ मर्यादित कालावधीसाठी व कठोर देखरेखीखाली आहे. प्रवाशांना मनस्ताप व त्यांची मोठी गैरसोय याचा विचार करून सरकारने सद्य परिस्थितीत घेतलेला हा निर्णय योग्य आहे, असे म्हणावे लागेल. याचा उद्देश सुरक्षा नियम शिथिल करणे नक्कीच नसून, इंडिगोला या अवधीत आवश्यक वैमानिकांची भरती, वेळापत्रक - रोस्टर इत्यादीं नियंत्रणात आणून प्रवाशांच्या दृष्टीने स्थिती सामान्य करण्यास संधी देणे हा आहे. या काळात त्यांना प्रगती अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वैमानिकांच्या साप्ताहिक विश्रांतीत वाढ, रात्रपाळीतील मर्यादा, ड्यूटी-रोस्टरच्या सुधारणा व वाढीव उड्डाण वेळापत्रक यासाठी आवश्यक पुरेसे वैमानिक नसल्यामुळे शेकडो फ्लाईट कॅन्सल होऊन निर्माण झालेल्या इंडिगोमधील गोंधळाची स्थिती अजून बिघडून प्रवासी वेठीस धरले जाऊ नये, यासाठी डीजीसीएने इंडिगोस 10 फेबुवारी 2026 पर्यंत तात्पुरती सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ देण्यामागील उद्देश कंपनीला आवश्यक अधिक क्रू भरती (पायलट) करण्यास, रोस्टरमध्ये सुधारणा आणि संपूर्ण विस्कटलेले वेळापत्रक नियंत्रणात आणण्यास पुरेसा अवधी मिळावा, हा आहे.
धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ
18 विमाने रद्द
पुणे विमानतळावर सलग सहाव्या दिवशी सोमवारी (दि.08) रोजी इंडिगोची 18 विमाने रद्द झाली आहेत, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, ट्रॅफिक कंजेक्शन (विमान कोंडी) झालेला ’पार्कींग बे’ अखेर रिकामा झाला. उर्वरित 39 इंडिगो विमाने आणि इतर सर्व एअरलाइन्सची वाहतूक निर्धारित वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू होती, असे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
नवीन नियमांमुळे सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. हे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. विशेषत: सुधारित विश्रांती कालावधी आणि रात्रीच्या ड्युटीच्या वेळेवर असलेले निर्बंध, पायलटचा थकवा कमी करण्यास मदत करतील, त्यामुळे कॉकपिटमधील सतर्कता वाढेल. परंतु, जुने नियम अधिक लवचीक होते. त्यामुळे पायलटच्या आरोग्याचा प्रश्न आणि प्रवाशांवर अपघाताचे मोठे संकट होते. आता नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यसंतुलन राखले जाईल, आणि विमान अपघाताची शक्यता कमी होईल.
एक पायलट