

आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी (दि. 7) झालेल्या कांदा लिलावात नवीन लाल कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली. लिलावात प्रति 10 किलोस नवीन लाल कांद्यास 270 रुपये तर उन्हाळी गावरान कांद्यास 201 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे आणि उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
समाधानकारक भाव नसल्याने उन्हाळ्यात बहुतांश शेतकरीवर्गाने कांदा साठवणूक केली. अपेक्षित भावाची प्रतीक्षा शेतकरीवर्ग करत असताना भावात वाढ झाली नाही. पावसाने कांदा सडेल या भीतीने शेतकरीवर्गाने मिळेल त्या भावात विक्रीस सुरुवात केली. यामुळे आळेफाटा उपबाजारात ऑगस्टपासून कांदा आवक वाढत गेली. सध्याही या उन्हाळी गावरान कांद्यास समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आहेत. सध्या उन्हाळी कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे.
नोव्हेंबर महिन्याचे मध्यास नवीन लाल सेंद्रिय कांदा बाजारात विक्रीस आला. सुरुवातीस या कांद्यास कमी भाव मिळत होते. शुक्रवारी झालेल्या लिलावात लाल कांद्याच्या भावात वाढ झाली. आजच्या लिलावत पुन्हा या भावात मोठी वाढ झाली.
तुलनेत उन्हाळ कांद्याचे भाव स्थिरच राहिले. नवीन लाल कांद्याचे पावसाने घटलेले उत्पादन, देशांतर्गत बाजारात वाढलेली मागणी व गावरान कांद्याची कमी आवक यामुळे लाल कांद्याचे भावात वाढ झाली असल्याची माहिती अडतदार व्यापारी संजय कुर्हाडे, विजय कुर्हाडे, अनिल गडगे, जीवन शिंदे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, नीलेश भुजबळ, चारूदत्त साबळे यांनी सांगितले.
लिलावात 15 हजार 641 गोणी कांदा विक्रीस आला होता. त्यातील 4 हजार गोणी नवीन कांदा असल्याची माहिती संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे आणि कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली. प्रतवारीनुसार नवीन लाल कांद्यास प्रति 10 किलोस 60 ते 270 व गावरान कांद्यास 50 ते 201 रुपये भाव लिलावात मिळाला.