

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेास पक्षासमवेत आघाडी करण्याच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटांतच फाटाफूट पडली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आघाडी करण्यास विरोध दर्शविल्यानंतर एका गटाने थेट त्यांच्याविरोधात भूमिका घेत जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते आघाडीसाठी आग््राही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे, असे असतानाच राष्ट्रवादी पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या आघाडीला थेट विरोध केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमवेत आघाडी केल्यास थेट पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेला माजी आमदार जयदेव गायकवाड यांनीही पाठिंबा दिला आहे, तर पवारांच्या राष्ट्रवादीतीलच अन्य पदाधिकारी मात्र आघाडी व्हावी, यासाठी आग््राही आहेत. त्यामध्ये प्रवक्ते अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकीकडे पक्षात दोन मतप्रवाह असतानाच शहराध्यक्ष जगताप यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन महापालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडीसमवेतच एकत्र लढविण्याची मागणी करत अन्य पक्षासमवेत आघाडी करण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर पवारांनी महाविकास आघाडी समवेतच एकत्र निवडणूक लढवली जाईल, अन्य कोणासमवेतही जाणार नाही, असे आश्वासन दिले असल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, आता जगतापांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमवेत आघाडी करण्यास विरोध केल्यानंतर त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील एका गटाने मोहीम उघडली आहे. पवार गटातील शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विनायक चाचर यांनी जगताप यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. जगताप यांनी मांडलेली भूमिका ही त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत अथवा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत कोणताही ठराव झालेला नाही.
जगताप यांची भूमिका पक्षाला खिंडीत पकडणारी आहे. स्वतःचं अस्तित्व नष्ट होण्याच्या भीतीपोटी त्यांनी हे विधान केले आहे. एकतर त्यांनी पक्षातून बाहेर पडावे अन्यथा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी चाचर यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. त्यामुळे आघाडीच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी पवार गटातील पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्याचे चित्र दिसत आहे.