

पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविताना काही नागरिकांनी जोडलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याची धक्कादायक माहिती हरकती सोडवताना उघड झाली आहे. आधारकार्ड, मतदार ओळखपत्रे आणि वीजबिले यांसह विविध दस्तऐवजांच्या बनावट साक्षाकिंत प्रती जोडून काहींनी आक्षेप नोंदवले आहेत. नोंदविण्यात आलेल्या एकूण हरकतींपैकी तब्बल 30 टक्के हरकतींसोबत खोटे पुरावे जोडले गेले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत 22 हजार 809 हरकती दाखल झाल्या आहेत. नागरिकांकडून सादर केलेल्या अनेक अर्जांबरोबर जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार आढळल्यामुळे संबंधित हरकतींची दखल घ्यायची की नाही, असा प्रश्न निवडणूक विभागासमोर निर्माण झाला आहे. त्यानुसार, हरकत निकाली काढण्यापूर्वी जोडलेल्या पुराव्यांची सखोल शहानिशा करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
महापालिकेने प्रभागनिहाय मतदारयादी तयार करताना ’सॉफ्टवेअर’चा वापर केल्याचा दावा केला असतानाही यात मोठा गोंधळ दिसून आला. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागातच नव्हे, तर विधानसभा व लोकसभा मतदारसंघ ओलांडून लांबच्या प्रभागांत दाखल करण्यात आली आहेत. उदा., खेड शिवापूर येथील नावे सिंहगड रस्त्यावरील सनसिटी प्रभागात, तर मुंढवा येथील नावे वारज्यातील प्रभागात दिसून आली. या गोंधळानंतर तक्रारींच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती.
तक्रारी दाखल करताना आधारकार्ड, मतदार ओळखपत्र किंवा वीजबिलाची सांक्षाकित प्रत जोडणे अनिवार्य होते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान (एआय) वापरून हुबेहुब बनावट प्रत तयार करून जोडण्यात आल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे तक्रारींची छाननी करताना पुरावे खरे की खोटे याची खात्री करणे ही महापालिकेची अतिरिक्त जबाबदारी ठरली आहे.
हरकत नोंदविताना जोडलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि पडताळणीदरम्यान काही दस्तऐवज हे एआयद्वारे बदलले असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. आयुक्तांशी चर्चा करून खोटे पुरावे जोडणाऱ्यांवर कोणती कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका