Fruit Quality Center Technology: इस्त्रायलचे मार्गदर्शन; ‘फळ गुणवत्ता केंद्रातील तंत्रज्ञान’ शेतात वापरा, उत्पादनात मोठी वाढ
पुणे: भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्र हेच महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यासाठी फळांच्या गुणवत्ता केंद्रामार्फत दर्जेदार रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. जेणेकरुन फळपिकांच्या उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल. त्यासाठी गुणवत्ता केंद्रावरील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दलचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष वापर हा शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यास त्यांना प्रोत्साहित करण्याची सूचना नवी दिल्ली येथील इस्त्रायल दुतावासचे कृषी अधिकारी ऊरी रुबीनस्टेन यांनी केली आहे.
राज्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत इंडो-इस्त्रायल आंतरराष्ट्रीय करार झालेला आहे. त्याअंतर्गत राज्यात केशर आंबा गुणवत्ता केंद्र हिमायतबाग (जि. छत्रपती संभाजीनगर), हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोली (जि. रत्नागिरी), संत्रा गुणवत्ता केंद्र, नागपूर (जि. नागपूर) आणि डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरी (जि.अहिल्यानगर) अशी चार केंद्रे स्थापन झालेली आहेत.
याबाबत शिवाजीनगर येथील साखर संकुलात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभागृहात राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या (एनएचएम) गुणवत्ता केंद्राची आढावा बैठकीसाठी आले असता मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एनएचएमचे व्यवस्थापकीय संचालक अशोक किरनळ्ळी हे होते. यावेळी दिल्लीचे या प्रकल्पाचे अधिकारी बह्म देव, गुणवत्ता केंद्राच्या प्रतिनिधींमध्ये केशर केंद्राचे डॉ. संजय पाटील, डाळिंब केंद्राचे डॉ. एस. पी. गायकवाड, नागपूर कृषी महविद्यालयाचे सहायक प्राध्यापक आर. खोबागडे हे समक्ष, तर हापूस केंद्राचे दापोलीचे डॉ. महेश कुलकर्णी व डॉ. विनोद राऊत ही व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उपस्थित होते.
गुणवत्ता केंद्रामुळे फलोत्पादन उत्पादनवाढीस बळकटी...
केशर आंबा, हापूस आंबा, संत्रा व डाळिंब फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिके घेणे.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका उभारून उच्च प्रतीच्या कलमे रोपांचा शेतकऱ्यांना पुरवठा करणे.
नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्याच्या दृष्टीने विस्तार कार्याद्वारे अंमल करणे.
गुणवत्ता केंद्रामार्फत दर्जेदार कलमे, रोपांचे उत्पादन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाबरोबर ड्रीप इरिगेशन व फर्टिगेशनाबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
इनलाईन सिंचन प्रणाली, उंच बेड तयार करणे, वाय कोन तंत्रज्ञान, मशीनद्वारे छाटणी, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनावर प्रात्यक्षिकांचा समावेश.
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रकल्पातून केशर आंबा, हापूस आंबा, संत्रा व डाळिंब गुणवत्ता केंद्रे कार्यरत झालेली आहेत. राज्यातील ही गुणवत्ता केंद्रे म्हणजे फलोत्पादन लागवड, उत्पादन वाढ व उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे ”हॉर्टिकल्चर स्टेट” म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख अधोरेखित होण्याचा विश्वास आहे.
अशोक किरनळ्ळी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे.

