

पुणे : सुजमाल सुफलाम असलेल्या आपल्या भारताला स्वातंत्र्यानंतर अमेरिकेकडून धान्य आयात करावे लागल्याची लाजीरवाणी बाब ठरली होती. त्यावर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला.
देशातील हरितक्रांतीमुळे धान्योत्पादन वाढून अमेरिकेसह अन्य देशांना शेतमाल निर्यातीत आपण आघाडीवर आहोत. ही सर्व प्रगती हरितक्रांतीचे जनक डॉ. एम.एस स्वामिनाथन यांच्यासह केंद्र सरकारचे सकारात्मक धोरण, शेतकऱ्यांच्या श्रमामुळे झालेली असल्याचे गौरवोद्गगार भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयआयएसईआर) संचालक प्रा. सुनिल भागवत यांनी काढले.
केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआयआर) मांजरी येथील राष्ट्रीय पुष्पविज्ञान संशोधन संचालनालयाचा १६ वा वर्धापनदिन बुधवारी (ता.१०) मांजरी येथील मुख्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी भागवत हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय पुष्पविज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. व्ही प्रसाद, राजगरुनगर येथील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय महाजन, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, पुणेचे प्रमुख डॉ. अनिल खर, दिल्ली येथील क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ सल्लागार हरिष मेहता, वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, आयकर विभागाचे सह आयुक्त दिनेश होनमाने आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या राजगुरूनगर येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय महाजन म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात जन्मापासून ते मृत्यूपर्यत फुलांना विशेष महत्व आहे. मात्र, देशात सध्या प्लॅस्टिक फुलांचे झालेले आक्रमण रोखल्याची गरज असून तसे झाल्यास सर्व प्रकारच्या फुलांना ग्राहकांकडून मागणी वाढेल. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणाऱ्या असल्याने फुलशेतीला उज्वल भविष्य असल्याचे ते म्हणाले.
वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसिंग म्हणाले की, शेतकऱ्यांची पिकांची सर्वाधिक नासाडी ही रानडुक्कर, निलगाईमुळे होत असून शासन नुकसानीपोटी आर्थिक मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर आयकर विभागाचे सह आयुक्त दिनेश होनमाने म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातील पाच ते दहा टक्के वाटा हा बचत खाते, सुकन्या योजना, भविष्य निर्वाह निधी, मॅच्युअल फुंडामध्ये गुंतविण्याची गरज आहे. तरच अशी रक्कम अडचणीच्या काळात मदतीस येईल. तसेच राष्ट्रीय पुष्प संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. व्ही प्रसाद यांनी प्रास्तविकामध्ये म्हणाले की, संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत पुढील पाच वर्षामध्ये हवामानावर आधारित फुलशेती करण्याचे उद्दीष्ठ ठेवल्याचे नमूद केले. कार्यक्रमात संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डी. एम. फिरके यांनी नियोजन, तारकनाथ साह यांनी सूत्रसंचालन, तर मुख्य शास्त्रज्ञ प्रशांत कवर यांनी आभार मानले.
अनिकेत चौरै (टिळेकरवाडी, हवेली), सुयोग चौधरी (सोरतापवाडी), ज्ञानेश्वर आडकर (पवना फुल उत्पादक संघ), सुमन कदम, सुरेखा कदम (निरगुडी), अनिल शिंदे, पुंडलिक निम्हण (पाषाण) या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कृषी आणि फुलशेती पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दै.'पुढारी'चे वरिष्ठ बातमीदार किशोर बरकाले यांच्यासह पत्रकार कृष्णकांत कोबल, गणेश कोरे, संदीप नवले आदींनाही शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन प्रा. सुनिल भागवत व डॉ. के.पी.प्रसाद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जगात धान्योत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक लागतो. तर अमेरिकेकडे शेतीसाठी भारतापेक्षा चौपट क्षेत्र आहे. असे असूनही अमेरिकेला मागे टाकत जगात धान्योत्पादनात भारताने मुसंडी मारत दुसरे स्थान पटकावले असल्याची माहिती दिल्ली येथील क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ सल्लागार हरिष मेहता यांनी यावेळी बोलताना दिली. धान्योत्पादनात आपण स्वयंपूर्ण होऊन आता मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांची नवीन पिढी ही जागरुक व शिक्षीत असल्याने कृषी निविष्ठांची खरेदी करताना अधिक काळजी घेत आहे. शेतीमधील महिलांचा सहभाग 21 टक्के असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील वाढ ही फलोत्पादनातून अधिक होत असल्याचे ते म्हणाले.