

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन 'आविष्कार संशोधन स्पर्धा 2025' या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत येथील कृषी महाविद्यालयातील पदवी संघाने अभूतपूर्व कामगिरी केली. दिनांक 5 व 6 डिसेंबर रोजी बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत पुणे महाविद्यालयाच्या संघाने सर्वाधिक पारितोषिके पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावर्षीच्या स्पर्धेमध्ये 37 कृषी महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणारे 230 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सहा वेगवेगळ्या शाखांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पुणे कृषी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत पारितोषिकांवर आपली छाप सोडली. पारितोषिक विजेते विद्यार्थी. ः मानवशास्त्र, भाषा व ललित कला - सिमरन सय्यद (प्रथम क्रमांक).
वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा - श्रेया शहा (प्रथम क्रमांक), वैष्णव काळे (तृतीय क्रमांक). शुद्ध विज्ञान शाखा - मयंक शर्मा (प्रथम क्रमांक). कृषी आणि पशुसंवर्धन शाखा ः राजेश शिंदे (प्रथम क्रमांक). सिद्धेश तेलवेकर (तृतीय क्रमांक).अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखा ः वैष्णवराज पाटील (द्वितीय क्रमांक), शुभम दत्ता (तृतीय क्रमांक).
या उल्लेखीनय कामगिरीसोबतच महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्साही सहभाग नोंदविला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीमागे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रितम शिंदे आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. लीना शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा तीन स्तरांवर म्हणजे पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अशी घेण्यात आली होती.
या स्पर्धेत विजयी ठरलेले विद्यार्थी आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात होणाऱ्या 18 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धा 2025 मध्ये (संशोधन अधिवेशन) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी पुणे कृषी महाविद्यालयाच्या संशोधन संस्कृती, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनाशक्ती आणि अध्यापक वर्गाच्या मार्गदर्शनाची परिणामकारकता अधोरेखित करणारी ठरली आहे.