

पुणे : राज्यातील लहान मुलींच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य शासनाने पुणे जिल्ह्यात 'सर्व्हायकल कॅन्सरमुक्त महाराष्ट्र' ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे.
देशात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. दररोज सुमारे 200 महिलांचे प्राण घेणारा हा देशातील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग आहे. नियमित तपासणी, योग्य वेळी लसीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार केल्यास हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो, यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेली ही मोहीम 9 ते 14 वर्षे वयोगटांतील किशोरवयीन मुलींमध्ये लवकर जागृती, प्रतिबंध आणि एचपीव्ही लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम यावर आधारित आहे.
राज्य शासनाने जीविका फाउंडेशनची (जीविका हेल्थकेअर) अंमलबजावणी भागीदार म्हणून नियुक्ती केली आहे. आतापर्यंत 6 हजारांहून अधिक मुलींचे एचपीव्ही लसीकरण केले आहे. आणखी 5 हजार लाभार्थींना संरक्षण देण्याचे नियोजन आहे.
सर्व्हायकल कॅन्सरमुक्त महाराष्ट्र मोहीम ही राज्यातील प्रत्येक मुलीपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. आपल्या मुलींचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून, राज्याच्या आरोग्यदायी भविष्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने सीएसआरच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवावा.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.