

Gunbote wife Pune recalls terror attack incident
पुणे : पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक भारतीय पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी केवळ भारतीय पुरूष पर्यटकांवरच गोळीबार करत त्यांच्या बायको-मुलांसमोर त्यांना जीवे मारले.
पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव आणि कुटुंबीय गुरूवारी (दि.२४) महाराष्ट्रात दाखल झाले. मृतांवर शोकाकुल वातावरणात आज (दि.) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुणे येथील कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी साळवे गार्डन, अप्पर इंदिरानगर येथे आणण्यात आले. यावेळी परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो नागरिक आणि राजकीय नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनीदेखील गनबोटे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचेदेखील सांत्वन केसे. यावेळी गनबोटे यांच्या पत्नींनी शरद पवार यांना पहलगामच्या बैसरण व्हॅलीमधील हल्ल्यावेळचा थरार सांगितला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनाचे (उबाठा गट) वसंत मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, आम आदमी पार्टीचे एकनाथ ढोले आदींची उपस्थिती होती.
गनबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, "जीव वाचवण्यासाठी आम्ही कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या. दहशतवाद्यांसमोर जोरजोरात अजाण म्हणू लागलो. त्यानंतर माझ्या नवऱ्याचा मित्र एका कोपऱ्यात बसला होता, त्याला दहशतवाद्यांनी बोलावून घेतले. '...अजाण पढता हैं क्या..., बोलता हैं क्या कुछ... असं विचारलं'. आम्ही त्या दहशतवाद्याचं ऐकूण भराभरा टिकल्या काढून फेकल्या, कारण आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे 'अल्लाहू अकबर..., अल्लाहू अकबर...' म्हणायला लागलो. आम्ही जोरजोरात 'अल्लाहू'चा धावा करायला लागलो", असा चित्तथरारक प्रसंग गनबोटे यांच्या पत्नीने सांगितला.