

Pahalgam Terror Attack
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यु झाला. विनय नरवाल यांना त्यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्यासमोरच गोळ्या झाडल्या गेल्या. विनय नरवाल यांचे पार्थिव बुधवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी पत्नी हिमांशी नरवाल काही क्षण पार्थिवासमोर उभ्या राहिल्या आणि पार्थिवाला बिलगून हंबरडा फोडला. 'जय हिंद' म्हणत त्यांनी पतीला श्रद्धांजली वाहिली आणि साश्रू नयनांनी निरोप दिला. काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग होता. हा प्रसंग पाहून उपस्थितांसह देशवासीयांनाही अश्रु अनावर झाले. १६ एप्रिलला त्यांचे लग्न झाले होते.
हरियाणाच्या करनाल येथे वास्तव्यात असणारे विनय नरवाल भारतीय नौदलाचे लेफ्टनंट होते आणि पत्नी हिमांशी नरवाल शिक्षिका आहेत. दोघेही लग्नानंतर काश्मीर येथे पर्यटनाला गेले होते. त्यांच्या या आनंददायी प्रवासात दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना पत्नीच्या डोळ्यादेखत गोळ्या घालून ठार केले आहे. विनय नरवाल यांच्या जाण्याने पत्नीसह कुटूंबावर दुखाचे आभाळ कोसळले. दरम्यान, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विनय नरवाल यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी हरियाणातील कर्नाल या त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले.
विनय नरवाल आणि पत्नी हिमांशी नरवाल स्विझर्लंडला फिरायला जाणार होते. मात्र स्विझर्लंडचा व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे ते काश्मीरला गेले आणि यादरम्यान विनय नरवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ला होत असाताना विनय नरवाल यांना गोळ्या झाडण्यात आल्यानंतर हिमांशी नरवाल त्यांच्या शेजारी बसल्या असलेला एक फोटोही मंगळवारपासून समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये हिमांशी यांनी नववधू म्हणून घातलेल्या हातातील लाल बांगड्याही स्पष्ट दिसत होत्या.
१६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल यांनी आयुष्यभरासाठी अनेक स्वप्न बघितले असतील. काश्मिरला जात असताना किंवा तिथे असताना त्या स्वप्नांच्या बद्दलही ते बोलले असतील. मात्र दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि यात विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. एका क्षणात आयुष्यभरासाठी पाहिलेले स्वप्न कोसळली. ज्याच्या सोबत आयुष्य फुलवण्याची स्वप्न बघितली होती, त्या जोडीदारालाच दहशतवाद्यांनी पत्नी हिमांशीसमोर गोळ्या घातल्या होत्या.