

Pahalgam Terror Attack
दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचा वज्रनिर्धार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. भारताने काल रात्री दिल्लीतील पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावले आणि त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक पर्सोना नॉन ग्राटा नोट सुपूर्द केली आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने पूंछच्या लसाना वनक्षेत्रात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुप (SOG) सोबत संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे.
दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सौदी अरेबियाचा दौरा मध्येच सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पहाटे दिल्लीत पोहोचले. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील आपला अमेरिका दौरा अर्धवट सोडून दिल्लीत पोहचले आहेत. मोदींनी काल अशा हल्ल्याचा निर्णय घेणाऱ्या केंद्रीय सुरक्षा समितीची प्रदीर्घ बैठक घेतली. मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह गृह आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दहशतवादी हल्ला आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत विस्तृत विचारविनिमय करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत पाच निर्णय घेत भारताने पहलगाम हत्याकांडाबद्दल आपली पहिली संतप्त प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानला कडक उत्तर देण्याची सुरुवात म्हणून १९६० साली करण्यात आलेला सिंधू जलवाटप करार तत्काळ स्थगित करण्यात आला आहे. पाकचा दहशतवादी चेहरा बदलत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील. अत्तारी चेक पोस्टदेखील तत्काळ बंद करण्यात आली आहे. या चेकपोस्टवरून ज्यांनी अलीकडे-पलीकडे प्रवास केला ते १ मे पूर्वी आपापल्या ठिकाणी परत जाऊ शकतात.
तत्पूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन लष्कराला सतर्कतेचे आदेश दिले. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. या बैठकीत सैन्य दलाने बदला घेण्याचा पर्याय सुचविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पर्यटक हत्याकांडाचे अत्यंत जबरदस्त व स्पष्ट उत्तर दिले जाईल. ज्यांनी हे हत्याकांड घडवले त्यांनाच नव्हे तर या हत्याकांडामागील सूत्रधारांनाही आम्ही हुडकून काढू आणि सजा देऊ, असे राजनाथ सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या हत्याकांडाची जबाबदारी लष्कर-ए-तय्यबाची शाखा असलेल्या रेजिस्टन्स फ्रंटने घेतली आहे. या संघटनेला आयएसआय ही पाकिस्तानची घातपाती गुप्तचर यंत्रणा सतत पाठबळ देते. त्याकडे राजनाथ सिंह यांचा निर्देश होता.