
जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे सगळ्या पुणे शहरात शोककळा पसरली असून, त्यांच्या घरी साळवे गार्डन, अप्पर इंदिरानगर येथे अंत्यदर्शनासाठी शेकडो नागरिक आणि राजकीय नेते उपस्थित होते.
गनबोटे यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले, आणि “भारत माता की जय!” अशा घोषणांसह त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवाराने त्यांना श्रद्धांजली वाहिली. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव दाखल झाले.
या अंत्यदर्शनासाठी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उबाठा गट) चे वसंत मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, आम आदमी पार्टीचे एकनाथ ढोले आदींची उपस्थिती लक्षणीय होती. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहून गनबोटे कुटुंबीयांना धीर दिला.
हा हल्ला केवळ कौस्तुभ गनबोटे यांचे कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण शहरासाठी धक्कादायक आहे. दहशती हल्ल्याच्या या घटनेने सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. कौस्तुभ यांच्या जाण्याने एक संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व हरपलं आहे. त्यांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या मनात सदैव जिवंत राहतील.