Pahalgam Attack: ...तर असे दहशतवादी हल्ले होतच राहतील : रॉबर्ट वधेरा
Robert Vadra on Pahalgam Attack
नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, सर्वच राजकीय पक्षांनी याचा तीव्र निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचे पती व्यावसायिक रॉबर्ट वधेरा यांचे वक्तव्य चर्चेचे ठरले आहे.
देशातील मुस्लिम विरोधी वातावरण हाच अशा हल्ल्यांचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
देशात मुस्लीमविरोधी वातावरण..
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना वधेरा म्हणाले, “या हल्ल्यात ज्या 28 लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्याप्रती मी श्रद्धांजली अर्पण करतो. देशात सध्या मुस्लिमांविरोधात जी भावना पसरवली जात आहे, तीच या हल्ल्याचे कारण आहे.
माझ्या मते, मुसलमानांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखले जाते किंवा एखादी मुर्ती सापडते का हे पाहण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण केले जाते, जसं संभळमध्ये घडतंय.
तर असे हल्ले घडतच राहतील...
ते म्हणाले, बाबर आणि औरंगजेब यांच्या मुद्यांवरून अल्पसंख्यांक समुदायाला दुखावले जाते. त्यावर राजकारण होतं आणि मर्यादा लादल्या जातात. धर्म आणि राजकारण वेगळं असायला हवं. हे जर थांबवलं नाही, तर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले घडतच राहतील.
कारण दहशतवाद्यांनी ओळख विचारून गोळ्या झाडल्या. कोणाला मारायचं, कोणाला सोडायचं हे त्यांनी ठरवलं. कारण त्यांच्या मते मुसलमान दडपले जात आहेत.
“दहशतवाद्यांना ओळख का बघावी लागते?”
वधेरा म्हणाले, “या दहशतवादी घटनेचे विश्लेषण केल्यास, जर दहशतवादी लोकांची ओळख पाहत असतील, तर ते तसे का करतायत? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुसलमानांमध्ये दुभंग निर्माण झाला आहे.
त्यामुळे अशा संघटनांना वाटतं की हिंदू, सर्व मुसलमानांसाठी अडथळा निर्माण करत आहेत. ओळख पाहून हत्या करणे हे पंतप्रधानांसाठी एक संदेश आहे – कारण मुसलमान स्वतःला दुर्बळ समजत आहेत, अल्पसंख्यांक घाबरत आहेत.
हे वरच्या पातळीवरून सांगितलं गेलं पाहिजे की आपण आपल्या देशात सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष आहोत आणि आपण अशा घटनांना थारा देणार नाही.”
एकाला मोकळीक, दुसऱ्याला मर्यादा हे जग पाहतंय
वधेरा यांनी असंही म्हटलं, “मला खूप वाईट वाटतं आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती माझ्या गहिर्या संवेदना आहेत. आपल्या देशातील सध्याचे सरकार हिंदुत्वाचा प्रचार करते आणि अल्पसंख्यांकांना अस्वस्थ आणि असुरक्षित वाटते.
एका समुदायाला रस्त्यावर सण साजरे करण्याची, प्रार्थना करण्याची, प्रचार करण्याची मोकळीक आहे, तर दुसऱ्या समुदायाला मर्यादा लादल्या जातात. हे सगळं जग पाहतंय. ते देखील समाधानी नाहीत. काही दिवसांत अमरनाथ यात्रा आहे, त्यातही अडथळे येतील.”
