पुण्यात पडझड रोखण्यासाठी भाजपाचे ‘फडणवीस अस्त्र’

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सत्ताधारी भाजपमधील अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने ही संभाव्य पडझड रोखण्यासाठी आता भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लक्ष घातले आहे. पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांना थेट फडणवीस यांच्याकडून संपर्क सुरू असून, त्यांना पुन्हा सत्तेत आल्यानंतर विविध पदे देण्याचे आश्वासने दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे 16 नगरसेवक 'राष्ट्रवादी'च्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर गत आठवड्यात भाजपच्या नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांचा पक्ष प्रवेश करून घेऊन राष्ट्रवादीने भाजपला पहिला धक्का देण्याचे काम केले. येत्या काही दिवसांत वडगाव शेरीसह शहरातील आणखी काही मतदारसंघातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा आहे. त्यामुळे नक्की कोणते नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अशा काही नगरसेवकांना थेट विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडून संपर्क केला जात आहे.

संबंधितांना 'तुम्ही पक्ष सोडण्याचा विचार करू नका. महापालिकेत पुन्हा आपलीच सत्ता येणार आहे. त्यात तुम्हाला महत्त्वाच्या पदावर संधी मिळेल', असे आश्वासन दिले जात असल्याचे काही नगरसेवकांकडून सांगण्यात आले. त्यात काहींना तर थेट महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. थेट फडणवीस यांच्याकडूनच संपर्क झाल्यानंतर आता पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यामुळे आता काही तर आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच पुढील परिस्थिती पाहून पुढची भूमिका ठरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीतील दिग्गजही भाजपच्या वाटेवर!

एकीकडे भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही दिग्गज नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यात प्रामुख्याने प्रभागरचनेमुळे ज्या नगरसेवकांची मोठी अडचण झाली आहे, अशा काही जणांचा समावेश आहे. त्यात हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासलामधील नगरसेवकांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपकडून राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे चित्र आहे.

आमचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार असल्याची केवळ अफवा उठविली जात आहे. याउलट राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये आलेले दिसतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुण्यातील प्रत्येक बारीक-सारीक घडामोडीवर लक्ष असते, हे राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात घ्यावे.
                                                                – गणेश बिडकर, सभागृहनेते, पुणे मनपा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news