चार्‍याची टंचाई, पशुखाद्याचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

चार्‍याची टंचाई, पशुखाद्याचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

राजेंद्र कवडे देशमुख

बावडा : एका बाजूला दूध खरेदीचे दर कमी झाले असतानाच दुसर्‍या बाजूला चार्‍याची टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, उन्हाळ्यामुळे कमी झालेले दूध उत्पादन अशाप्रकारे चोहोबाजूंनी सध्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुर्बल शेतकर्‍याला संरक्षण देण्यासाठी, शासनाने दूध खरेदी दरावरती नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे.

मध्यंतरीच्या काळात दुधाचे खरेदीचे दर प्रतिलिटरला 36 ते 37 रुपयांपर्यंत पोहचले होते, त्यामुळे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संकटातून बाहेर येत असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. या आनंदाच्या भरात अनेक दूध उत्पादक शेतकर्‍यांनी कर्ज काढून गोठ्यातील गाईंची संख्या वाढविली, तर ज्या शेतकर्‍यांनी दूध व्यवसाय बंद केले होते, त्यांनी नव्याने दूध व्यवसाय हे कर्ज काढून गाई खरेदी करून सुरू केले. मात्र, दुधाचे दर अचानकपणे 30/32 रुपयांपर्यंत खाली आल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे?

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? या विवंचनेत सध्या दूध उत्पादक शेतकरी असल्याची माहिती दूध व्यावसायिक अनिल काळे (रेडणी) यांनी दिली. सध्याच्या वाढत्या महागाईच्या पाश्र्वभूमीवर दुधाचे दर घसरल्याने दुधाचा उत्पादन खर्चही मिळालेल्या बिलातून निघत नाही, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुधाच्या खरेदी दरात वाढ करून, दूध दरासंदर्भात नियमावली तयार करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सदानंद कोरटकर (वकीलवस्ती), अतुल वाघमोडे (काटी) यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news