Heavy Rain in Delhi : वादळी वारे-पावसाने दिल्लीला झोडपले, शेकडो झाडे उन्मळून पडली, असंख्य विमानांचे मार्ग बदलले | पुढारी

Heavy Rain in Delhi : वादळी वारे-पावसाने दिल्लीला झोडपले, शेकडो झाडे उन्मळून पडली, असंख्य विमानांचे मार्ग बदलले

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला सोमवारी वादळी वारे आणि तूफान पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली तर असंख्य विमानांचे मार्ग बदलण्यात आले. पहाटे पाच वाजल्यापासून सुरु झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे ठिकठिकाणी जनजीवन अस्तव्यस्त झाले. ( Heavy Rain in Delhi )

Heavy Rain in Delhi : शेकडो झाडे उन्मळून पडली

दिल्लीबरोबरच नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम आणि गाजियाबाद आदी ठिकाणी वाऱ्यामुळे  शेकडो झाडे उन्मळून पडली. तर पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने अनेकजागी वाहतुकीची कोंडी झाली होती. झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वीजदेखील गायब होती. वारे आणि पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवर देखील झाला. कित्येक विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते तर अनेक विमानांचे आगमन आणि प्रस्थान लांबणीवर पडले होते. फरिदाबाद आणि नोएडा सकाळी सकाळी गारादेखील पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल, असे सांगितले आहे.

राजधानी दिल्लीत सोमवारी कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. रविवारी दिल्ली राजधानी क्षेत्रात ढगाळ वातावरण होते. पण सोमवारी पहाटेपासून वातावरणाचा रागरंग बदलून गेला आणि जोरदार पाऊस पडला. केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांमध्ये जोरदार हवा आणि वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

पाच राज्‍यांना हवामान विभागाचा अलर्ट

राजस्‍थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्‍ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्‍य प्रदेशमधील विविध जिल्‍ह्यांमध्‍ये मान्‍सूनपूर्व पावसाची शक्‍यता आहे. राजस्‍थान बिहार, झारखंड, पंजाब आणि हिमालच प्रदेशमध्‍ये मुसळधार पाऊस पडेल. तर उत्तर प्रदेश आणि मध्‍य प्रदेश, छत्तीसगडमध्‍ये विजाच्‍या कडकडाटासह पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे. मान्‍सूनपूर्व पावसामुळे उत्तर भारतातील नागरिकांची उष्‍म्‍यापासून काहीअंशी सुटका होणार आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button