थेट विदेशी गुंतवणुकीचा सार्वकालीन उच्चांक | पुढारी

थेट विदेशी गुंतवणुकीचा सार्वकालीन उच्चांक

विदेशी गुंतवणुकदारांची पहिली पसंती भारतच असल्याचे नव्याने शिक्कामोर्तब झाले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) आकडेवारीवरुन भारतात 2021-22 या वर्षात तब्बल 83.57 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक झाली असून, हा सार्वकालिन उच्चांक ठरला आहे.

1. विदेशी गुंतवणूक खेचण्यात महाराष्ट्र दुसरा

सर्वाधिक एफडीआय आपल्याकडे खेचण्यात महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशातील एकूण एफडीआयपैकी 26 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. याबाबतीत कर्नाटक अव्वल (38 टक्के) असून राजधानी दिल्लीने 16 टक्के गुंतवणूक आकर्षित करीत देशात तिसरे स्थान पटकावले.

2. का वाढली गुंतवणूक…?

एफडीआयचा हा विक्रमी आकडा म्हणजे केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत केलेल्या विविध धोरणात्मक सुधारणांचे फलित मानले जात आहे. सरकारने विदेशी गुंतवणुकदारांसाठी उदारमतवादी आणि पारदर्शक धोरण अंगिकारले असून त्याद्वारे बहुतांश क्षेत्रे थेट गुंतवणुकीसाठी खुली झाले आहेत. कोळसा खाणकाम, कंत्राटी उत्पादन, डिजिटल मीडिया, सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग, नागरी विमान वाहतूक, संरक्षण, वीमा तसेच दूरसंचार क्षेत्राबाबत महत्त्वाची पावले उचलली आहेत. देशातील उद्योगसुलभ वातावरण हेही एफडीआय वाढण्यामागील मुख्य कारण आहे.

3. अव्वल तीन गुंतवणूकदार देश

भारतात गुंतवणूक करण्यात सिंगापूर अव्वलस्थानी असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीत या देशाचा वाटा 27 टक्के आहे. त्यापाठोपाठ अमेरिका (18 टक्के) आणि मॉरिशसचा (16 टक्के) क्रमांक लागतो.

4. गुंतवणुकीचा वाढता ओघ

2018-19 : 62.00
2019-20 : 74.39
2020-21 : 81.97
2021-2022 : 83.57
(आकडे अब्ज डॉलर्समध्ये)

ठळक बाबी…
* 2003-04 च्या तुलनेत (4.3 अब्ज डॉलर्स) 2021-22 मधील गुंतवणूक वीस पटीने वाढली
* उत्पादन क्षेत्रात 21.34 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; 2020-21 च्या तुलनेत 76 टक्क्यांची वाढ
* कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसह सेवा आणि ऑटोमोबाईल क्षेत्र गुंतवणूक खेचण्यात आघाडीवर

Back to top button