

पुणे: स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना केवळ उघडकीस येणाऱ्या प्रकरणांपुरत्या मर्यादित नाहीत. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींकडूनच ठरावीक वर्तुळात गुप्तपणे प्रश्नपत्रिका पोहचवल्या जातात. या प्रकाराला 'सिस्टिम लीकेज' असे म्हणतात. मात्र, अशा घटनांची कुठेही वाच्यता होत नाही. त्यामुळे परीक्षा केवळ ऑनलाइन करून पेपरफुटीला आळा बसणार नाही. त्यासाठी बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था निर्माण करण्यासोबतच संपूर्ण परीक्षापद्धतीत तंत्रज्ञानाच्या मदतीने आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे' आणि 'साधना साप्ताहिक' यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ८१ व्या जन्म दिनानिमित्त 'स्पर्धा परीक्षांची पेपरफुटी कायमची थांबवता येईल का?' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी सावंत बोलत होते. या प्रसंगी 'अंनिस'चे दीपक गिरमे, गणेश चिंचोले, मिलिंद देशमुख, विनोद शिरसाठ, श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले की, पेपर फुटल्याची घटना समोर आल्यानंतर तो कसा फुटला, याचीच चर्चा होते. परंतु, आर्थिक व्यवहारातून किंवा परस्परसंबंधांतून होणारी गुप्त देवाणघेवाण हे परीक्षा व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. परीक्षा केवळ 'ऑनलाइन' केल्याने गैरप्रकार आपोआप थांबतील, हा समज चुकीचा आहे. डिजिटल परीक्षांमध्ये सर्व्हर बंद पडणे, मालवेअर किंवा रॅन्समवेअरचा हल्ला आणि दूरस्थ नियंत्रणातून (रिमोट अॅक्सेस) दुसऱ्यानेच पेपर सोडवणे, असे मोठे धोके आहेत. यासाठी सुरक्षेचे १५ प्रांत निश्चित करण्यात आले असून, परीक्षा सुरू होण्यापूर्वी, चालू असताना आणि संपल्यानंतर अशा तीन टप्प्यांत तब्बल ४५ बाबींवर लक्ष ठेवावे लागते.
पेपरफुटी आणि तांत्रिक ताण, यांवर मात करण्यासाठी सावंत यांनी 'अस्तित्वात नसलेला पेपर' ही अभिनव संकल्पना मांडली. या पद्धतीत प्रश्नपत्रिका आधीपासून संपूर्ण स्वरूपात तयार ठेवली जात नाही. त्याऐवजी मोठा प्रश्नसंच आणि पूर्वनिश्चित आराखडा तयार केला जातो. परीक्षा सुरू झाल्यानंतर या आराखड्यानुसार प्रश्नसंचातून एकावेळी एकच प्रश्न विद्यार्थ्याच्या स्क्रीनवर दाखवला जातो. विद्यार्थ्याने उत्तर दिल्यानंतर किंवा प्रश्न वगळल्यानंतर त्याला पुन्हा त्या प्रश्नाकडे मागे जाता येत नाही. संपूर्ण प्रश्नपत्रिका कुणालाच दिसत नसल्याने पेपर फुटण्याचा धोकाच उरत नाही, असे सावंत यांनी नमूद केले.
बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विद्यार्थी अनेकदा अंदाजाने उत्तरे देतात. हा प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्याला खरोखरच संकल्पना समजली आहे का? हे तपासण्यासाठी एक नवीन प्रणाली तयार करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. ते म्हणाले की, या प्रणालीमध्ये विद्यार्थ्याने एक पर्याय निवडल्यास तो का निवडला, यामागील विचार प्रक्रिया तपासणारे उपप्रश्न समोर येतात. यामुळे निव्वळ अंदाजाने योग्य उत्तरापर्यंत पोहचण्याची शक्यता संपुष्टात येते. सूत्रसंचालन शिरसाठ यांनी केले. ललवाणी यांनी आभार मानले.
पारंपरिक परीक्षापद्धतीच्या पुनर्विचाराची वेळ
सर्वांना समान प्रश्नपत्रिका देण्याच्या पारंपरिक पद्धतीचा आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगत सावंत म्हणाले की, अत्यंत कमी संधी आणि मोठी मागणी असताना संधींचे वाटप न्याय्य आणि पारदर्शक झाले पाहिजे. 'शिक्षणासाठी परीक्षा नाही, तर परीक्षेसाठी शिक्षण' अशी सध्याची विसंगत स्थिती आहे. 'व्हेरिएबल टाइम, फिक्स्ड रिझल्ट' या तत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्यासाठी लागणारा वेळ वेगळा असू शकतो, हे लक्षात घेऊन मूल्यमापन पद्धती विकसित करण्याची गरज आहे. एका प्रश्नानंतर मागे न जाण्याच्या नव्या पद्धतीला स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून सुरुवातीला विरोध होऊ शकतो, त्यामुळे या प्रणालीच्या व्यापक वापरापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये पूर्वकल्पना देऊन विश्वासार्हता निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.