

पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीची कामे सुरू झाली आहेत; मात्र, यंदा पाण्याची कमतरता, प्रतिकूल हवामान आणि बटाटा पिकावर झालेला लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढला असताना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे आणि पारगाव या गावांमध्ये बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा बटाटा बियाण्याचे दर आवाक्यात असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. सुरुवातीच्या काळात पिकासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे बटाट्याचे उत्पादन चांगले येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची कमतरता जाणवू लागली. त्यातच वातावरणातील उष्णता वाढल्याने बटाटा पिकावर लाल कोळी रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके व औषधांची फवारणी करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. प्रतिकूल हवामानाचा परिणाम बटाट्याच्या वाढीवर झाल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या बटाटा काढणीचा हंगाम सुरू झाला असून, बाजारात बटाट्याला १० किलोला सुमारे ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. मात्र, उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली मशागत, औषध फवारणी, मजुरी व इतर खर्च पाहता मिळणारा बाजारभाव समाधानकारक नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. या भागात व्यापारी थेट शेतात जाऊन काढणी सुरू असतानाच बटाट्याची खरेदी करताना दिसत आहेत.
दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकाची लागवड करतो. यंदा बियाण्याचे दर आवाक्यात असल्याने लागवडही चांगली झाली होती. बटाट्याला यंदा चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने पाठ फिरवली आणि वातावरण प्रतिकूल झाल्याने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पादनात घट झाली आहे. औषध फवारणीसह उत्पादन खर्चही वाढला असून, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
प्रकाश फुटाणे, बटाटा उत्पादक शेतकरी, थोरांदळे