

पुणे: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत १.२२ कोटी मतदारांना बजावण्यात आलेल्या नोटिसांपैकी ९५ टक्क्यांहून अधिक प्रकरणे कागदपत्रांच्या पडताळणीनंतर निकाली काढण्यात आली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ३० ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे सादर केलेल्या मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे १.२२ कोटी मतदारांना नोटिसा बजावल्या होत्या. संबंधित मतदारांनी आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांच्या प्रकरणांची पडताळणी करण्यात आली. कागदपत्रे सादर करणाऱ्या मतदारांना अडचणी येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, मतदार यादीतील तार्किक विसंगती आढळलेल्या ६२.४८ लाख मतदारांपैकी ९६.५१ टक्के मतदारांची कागदपत्रे तपासून प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. दुसरीकडे, मागील मतदार यादीशी मॅपिंग न होऊ शकलेल्या ५९.७५ लाख मतदारांपैकी ९३.७३ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
उर्वरित प्रकरणांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) या याद्यांची तपासणी करून संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात ९३.४० टक्के प्रकरणे निकाली
राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारीत पुणे जिल्ह्यात नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांपैकी ९३.४० टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राज्यात गडचिरोली, ठाणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पडताळणीचे प्रमाण सर्वाधिक आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये बीएलओंकडून मतदारांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१८.७९ लाख अर्ज दाखल
एसआयआर प्रक्रियेत ३१ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबरदरम्यान राज्यात एकूण १८ लाख ७९ हजार ५८४ अर्ज दाखल झाले आहेत.