बनावट ‘आधार’ बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका महिलेसह दोघांना बेड्या

Adhar fraud 1
Adhar fraud 1
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बनावट आधारकार्ड तयार करून देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करत विशेष शाखेच्या पथकाने महिलेसह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून आधारकार्डची दुुरुस्ती करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दहा फॉर्म आणि नगरसेवकांची नावे असलेले शिक्के आढळले.

अजिज युसूफ शेख (रा. घोरपडी गाव) आणि जोरना हसीम शेख (34, रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघे आरोपी इतर राज्यातील व्यक्तींबरोबरच बाहेरच्या देशातील नागरिकांना बनावट आधारकार्ड तयार करून देत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. टी. कवडे रोड येथील स्काय स्टार मल्टी सर्व्हिसेस येथे बनावट आधारकार्ड बनवून देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी नवीन आधारकार्ड बनवण्यासाठी, आधार कार्डची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले 10 फॉर्म आढळले. त्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची माहिती होती. तसेच फॉर्मवर पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचे नाव व सभासद पुणे मनपा, असा उल्लेख असलेला गोल शिक्का मिळून आला. दोन फॉर्मवर एका महिलेचा व पुरुषाचा फोटो, मनपा सभासद यांचा शिक्का असलेला व त्यावर इंग्रजीमध्ये स्वाक्षरी असलेला फॉर्म मिळून आला. तसेच इतर इसमांचे आधारकार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारे अर्धवट भरलेले फॉर्म सापडले.

ही कामगिरी विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र साळुंके, महिला सहायक पोलिस निरीक्षक वासंती जाधव, पोलिस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद, सहायक फौजदार अनिल घाडगे, इस्माईल शेख, सुधीर देशमुख, विजय भोसले, हवालदार भरत रणसिंग यांच्या पथकाने केली.

नगरसेवकाचा शिक्का, हुबेहूब स्वाक्षरी आढळली

इतर देशातून बेकायदा आलेल्या नागरिकांना आरोपी आधारकार्ड बनवून देत असल्याची शक्यता आहे. त्यासाठी खोटा रहिवासी पुरावा व इतर कागदपत्रे तयार करून दिली जात होती. केवळ सहाशे रुपयांत हे आरोपी बनावट आधारकार्ड तयार करून देत होते. शहरातील एका नगरसेवकाचा शिक्का व हुबेहूब सही करून कागदपत्रे तयार केली होती. दोघा आरोपींनी हे बनावट शिक्के कोठून मिळवले, त्यांनी आतापर्यंत अशा किती लोकांना बनावट आधारकार्ड तयार करून दिली आहेत, अशी सर्व माहिती पोलिस घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news