

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्या इनोवा या गाडीस मंगळवारी (दि. ७) दुपारी सासवड जेजुरी या रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात किरण गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आल्यानंतर समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांच्या गाडीने समोरील गाडीला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या , त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. गाडीचा वेग हा मर्यादित होता त्यामुळे देखील फारशी दुखापत झाली नाही. मात्र या अपघातांमध्ये ईनोवा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरण गुजर यांच्यावर काही जबाबदारी सोपवली होती. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेची छाननी करून ते पुण्यावरून बारामती कडे निघाले असताना सासवड पासून आठ कि.मी. अंतरावर हा अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कोणाला ही फारशी मोठी दुखापत झाली नाही. 'आपण सुखरूप असून, कोणीही काळजी करू नये', असा संदेश किरण गुजर यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.