

पुणे : वय म्हणजे फक्त एक आकडा असतो, याची प्रत्यक्ष प्रचिती देत ७० वर्षीय अनिल मगर यांनी आपला वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला.
वाढदिवशी पारंपरिक पद्धतीने केक कापण्याऐवजी त्यांनी सलग ७ तास न थांबता पोहत अनोखी कामगिरी केली. सातत्य, चिकाटी आणि मानसिक ताकदीच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली आणि तरुणाईला कार्यक्षम व सक्रिय राहण्याचा संदेश दिला.
बालगंधर्व येथील नांदे तलावात सकाळी १० वाजता त्यांनी जलप्रवासाला सुरुवात केली. स्विमिंग कोच आणि योग शिक्षक असलेल्या अनिल मगर यांनी अखंड पोहत १५ किमीचे अंतर पूर्ण केले. अनिल मगर यांनी १० व्या वर्षा पासून जलतरणाला सुरुवात केली. त्यांचे वडील देखील उत्कृष्ट जलतरणपटू होते.
आतापर्यंत त्यांनी ५० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील पूल व ओपन वॉटर स्पर्धा खेळल्या आहेत आणि समुद्रात भारताचे प्रतिनिधीत्व करत दूर अंतरे पार केले आहे. टिळक टँक, चॉईस हेल्थ क्लब व नांदेत त्यांनी कोचिंग केली आहे आणि अजूनही करत आहेत. धरमतर ते गेट वे आॅफ इंडिया पेसिंग केले आहे यापुढे त्यांना हा ईव्हेंट स्वतःसाठी करायचा आहे.
मगर म्हणाले, आजची पिढी मोबाईलमध्ये अडकून बसली आहे. सकारात्मक राहायचे असेल, मानसिक शक्ती वाढवायची असेल तर अॅक्टिव्ह राहणे गरजेचे आहे. वय काहीही असो, इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.