

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करत एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एका प्रवाशाला अटक करून तब्बल २ कोटी २९ लाख रुपये किंमतीचा हायड्रोपोनीक गांजा जप्त केला.
बँकॉकहून परतणाऱ्या या प्रवाशाने चतुराईने बॅगमध्ये हे अमली पदार्थ लपवून आणला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा साठा विमानतळावरच हेरून पकडण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी इंडिगोच्या 6E-1096 या विमानाने बँकॉकवरून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाबाबत शंका निर्माण झाली. एअर इंटेलिजन्स युनिटने नियमित तपासणीदरम्यान त्याचे वर्तन संशयास्पद आढळल्याने त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात आली.
त्याचे सामान उघडून सूक्ष्म तपासणी केल्यावर दोन बंद पिशव्यांमध्ये ठेवलेला २ हजार २९९ ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनीक गांजा आढळून आला. नियंत्रित, कृत्रिम शेती पद्धतीत तयार होणारा हा गांजा अत्यंत तीव्र आणि महागडा असल्याने अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात त्याला मोठी मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले. सापडलेल्या मालाबाबत प्रवाशाला विचारणा केली असता तो अडखळू लागला.
पुढील चौकशीत अखेर त्याने हा माल स्वतःसोबत आणल्याची कबुली दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला अमली पदार्थ नियंत्रण आणि मन:प्रभावी द्रव्य कायदा, १९८५ अंतर्गत तात्काळ अटक केली. या प्रकरणात आणखी कोणते व्यक्ती किंवा टोळ्या संबंधित आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हायड्रोपोनीक गांजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती तस्करी पाहता विमानतळांवर गस्त आणि तपासणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचेही सूचित करण्यात आले. एअर इंटेलिजन्स युनिट, पुणे आयुक्तालयाने केलेली ही कारवाई ही अलीकडील काळातील सर्वात महत्त्वपूर्ण कारवायांपैकी एक मानली जात आहे.