

पुणे : भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलुनिंग मोहिमेत बुधवारी पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. या अनोख्या मोहिमेने एक वेगळा इतिहास रचला आहे.
भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलुनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबरला हिरवा झेंडा दाखवण्यात होता. तब्बल 750 किलोमीटरहून अधिक हवाई प्रवास करताना संघाने मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यापासून महाराष्ट्रातील पश्चिम घाटापर्यंत विविध भूप्रदेशांचा प्रवास केला आणि महू, छ. संभाजीनगर, अहिल्यानगर येथे नियोजित थांबे घेतले.
प्रत्येक ठिकाणी संघाने स्थानिक तरुणांशी संवाद साधला, त्यांना या अनोख्या साहसी खेळाचे साक्षीदार होण्याची आणि राष्ट्रभावना वाढवण्यासाठी भारतीय सैन्याच्या वचनबद्धतेबद्दल जाणून घेण्याची संधी दिली.
या मोहिमेचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे 8 तास 44 मिनिटांचे विक्रमी विनाथांबा हॉट एअर बलून उड्डाण, ज्यामुळे त्याला भारतातील सर्वात जास्त कालावधीच्या हॉट एअर बलून उड्डाणाचा मान मिळून एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले. ही उल्लेखनीय कामगिरी संघसामर्थ्य आणि विमानचालन उत्कृष्टतेसाठीचा उत्तम नमुना ठरली.
संपूर्ण मोहिमेदरम्यान चमूने विद्यार्थी आणि तरुण इच्छुकांशी सक्रियपणे संवाद साधला. साहसाला जीवनशैली म्हणून प्रोत्साहन दिले आणि सशस्त्र दलांमध्ये रस निर्माण केला. प्रेरक भाषणे, प्रात्यक्षिके आणि संपर्क कार्यक्रमांनी लष्करी जीवनाची व्याख्या करणाऱ्या धैर्य, शिस्त आणि संघकार्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला.
दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी विक्रमी कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन केले आणि त्यांचा दृढनिश्चय, धैर्य आणि साहसी वृत्तीचे कौतुक केले. अशा अग्रगण्य उपक्रमांमुळे सैन्यातील साहसी संस्कृती बळकट होते आणि तरुणांशी जोडण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून काम करते, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय लष्कराच्या वतीने भोपाळ ते पुणे असा बलूनच्या माध्यमातून सैनिकांनी प्रवास केला यात त्यांनी देशसेवेचा अनोखा संदेश देत तरुणांना अनोखा संदेश दिला