

पुणेः सोशल मिडीयाच्या माध्यमातून झाले्लया ओळखीत एका डिलेव्हरी बॉयला हनीट्रॅमध्ये अडकवून खोटा पोक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी, 28 वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय शेलार, ऋषीकेश सुरते, राहुल शितोळे आणि एका तरुणीसह चौघांच्या विरु्दध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 7 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास कात्रज घाटाकडे जाणारा रोड आणि येवलेवाडी येथील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला आहे. चौकशीत यातील काही आरोपींवर सासवड पोलिस ठाण्यात देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण भुगाव येथील राहणार असून, तो डिलीव्हरी बॉयचे काम करतो. तो विवाहीत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याचा परिचय आरोपी तरुणीसोबत झाला होता. तिने त्याला आपले वय बावीस वर्ष असल्याचे सांगून, सात डिसेंबर रोजी भेटण्याच्या बहाण्याने रात्री आठ वाजताच्या सुमारास कात्रज चौकात भेटायला बोलावले. त्यानुसार तरुण आपल्या दुचाकीवर बसून तरुणीला भेटण्यासाठी गंधर्व लॉन्स समोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ गेला. त्यावेळी आरोपी तरुणी तरुणाला भेटली. दोघे दुचाकीवरून कात्रज घाटाच्या दिशने निघाले. काहीवेळात तीन दुचाकीवरून पाच तरुण तेथे आले. त्यांनी फिर्यादी तरुणाला अडवून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. आरोपीपैकी एका तरुणाने फिर्यादीला त्याच्या दुचाकीवर बसलेली तरुणी माझी बहीण आहे असे सांगून शिवीगाळ करू लागला. तरुणी देखील आरोपीपैकी एकाच्या दुचाकीवर बसून निघून गेली.
आरोपी टोळके तरुणाला जबरदस्तीने येवलेवाडी परिसरात घेऊन गेले. तरुणाला टोळक्याने शिवीगाळ करून मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणी पोलिस चौकीला तुझ्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यास गेल्याचे सांगितले. फिर्यादी तरुण घाबरला. त्याचवेळी एक आरोपी तेथे आला. त्याने तरुणाला तो पत्रकार असल्याचे सांगून तुझ्यावर पोक्सोच्या गुन्ह्याची बातमी उद्या पेपरला देतो धमकावून सत्तर हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादी तरुणाने घाबरून आपल्या एका मित्राला बोलावून घेतले. त्याच्याकडून दहा हजार घेऊन आरोपी टोळक्याला दिले. राहिलेले साठ हजार रुपये परत देतो असे सांगून मुदतीवर आपली सुटका करून घेतली. यावेळी आरोपींनी तरुणाचे आधार, पॅनकार्ड घेतले. तसेच त्याच्या घरच्यांचे संपर्क क्रमांक घेऊन पैसे नाही दिले तर घरच्यांना सांगेल असे धमकावले.
तरुणाने आरोपी तरुणीचे सोशल मिडीया अकाऊंट तपासले तेव्हा त्याला संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार त्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. आरोपी राहिलेल्या साठ हजार रुपयांची खंडणी तरुणाकडे मागत होते. परंतू पोलिसांनी सापळा लावल्याची चाहूल त्यांना कदाचीत लागली असावी, त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढळा.